पिंपरी-चिंचवड चेंबरच्या ‘एमएसएमई प्लस’ मासिकाचे प्रकाशन

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजने ‘एमएसएमई प्लस’हे औद्योगिक विषयाला समर्पित मासिक प्रकाशित करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. समाजाची जडणघडण होण्यासाठी, तसेच नव उद्योजकांना या माध्यमातून मार्गदर्शन, सल्ला आणि विविध शासकीय योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे, असे मत नाबार्डचे निवृत्त अधिकारी तथा महाराष्ट्र शिखर बँकेचे माजी चेअरमन डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी व्यक्त केले.

शेती उद्योगामध्ये अमुलाग्र बदल होत असून भविष्यकाळात समूह शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढेल. कारण अल्पभूधारक शेतकरी एकत्र येऊन आपल्या शेतीमध्ये अधिक उत्पादन, फायदा घेऊन जीवनात बदल घडवू शकतात. परदेशात अशा पध्दतीने शेती करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारतातही शेतकऱ्यांचा समूह शेती करण्याकडे कल वाढत आहे, तसेच सेंद्रिय शेती करण्याचेसुध्दा अनेक फायदे आहेत, असे डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या (पीसीसीआयसीएस) वतीने ‘एमएसएमई प्लस’ या सूक्ष्म लघु व मध्यम औद्योगिक मासिकाचे प्रकाशन शुक्रवारी (८ जुलै) ॲटो क्लस्टर सभागृह, पिंपरी येथे डॉ. सुखदेवे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णकुमार गोयल (कोहिनूर ग्रुप), संदेश सोनार (संचालक ईएसडीएस सॉफ्टवेअर, नाशिक), चेंबरचे अध्यक्ष ॲड. आप्पासाहेब शिंदे, उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सचिव रंगनाथ गोडगे पाटील, खजिनदार विनोद बंसल, रामदास माने, प्रदीप वैद्य, राजकुमार अगरवाल, निलय वानखेडे, अशोक चव्हाण, आर. डी. कुटे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा तसेच रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल चेंबरचे अध्यक्ष ॲड. आप्पासाहेब शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात ॲड. आप्पासाहेब शिंदे यांनी चेंबरच्या पंधरा वर्षांच्या कार्याचा आढावा घेऊन मासिक प्रकाशित करण्याचा हेतू विशद केला. महाराष्ट्रातून टाटा, बिर्ला यांसारखे उद्योजक घडविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन या मासिकाव्दारे केले जाईल असे सांगितले.

कृष्णकुमार गोयल म्हणाले की, आपण जसा विचार करतो, तसे घडतो. छोट्या छोट्या गोष्टींतून माणसाच्या मनावर संस्कार होतात आणि तो त्याव्दारे पुढे मार्गक्रमण करतो. उद्योग व्यवसाय सुरू करून नावारूपाला आणताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, हिंमत न हारता उत्साहाने, जिद्दीने अडचणींशी मुकाबला करा. त्यातूनच आपल्याला यशाकडे वाटचाल करता येईल.

याप्रसंगी चेंबरचे उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल, रामदास माने, संदेश सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकळे तर आभार आर. डी. कुटे यांनी मानले. कार्यक्रमास चेंबरचे सभासद, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share to