खासदार आप्पा बारणेंवर गद्दारीचा शिक्का !
- पडत्या काळात ठाकरेंची साथ सोडल्याचा ठपका
- सोशल मीडियावर कट्टर शिवसैनिकांचा संताप
पिंपरी | अमोल शित्रे
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेला अखेर रामराम ठोकला. आगामी राजकीय वाटचाल सोपी करण्यासाठी त्यांनी बंडखोरांच्या गोटात उडी ठोकली. पक्षाच्या कठीण काळात उपकाराची जाणिव न ठेवता असा निर्णय घेतल्याने त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारीच केल्याचे मानले जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन भाजपासोबत घरोबा केला. शिवसेनेच्या उर्वरीत आमदारांनी देखील शिवसेनेसोबत गद्दारी करत शिंदे गटात उड्या ठोकल्या. आता पिंपरी-चिचंवडमध्ये सुध्दा शिवसेनेला खिंडार पडत आहे. मावळ मतदार संघांचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी बंडखोरांच्या गोटात सामील होऊन शिवसेनेला जबरदस्त धक्का दिला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेला तडे गेले आहेत. त्यांना माणणारा काही शिवसैनिकांचा शहरातील एक गट आता कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेशी गद्दारी
2014 ला मावळ लोकसभा मतदार संघातून माजी खासदार गजानन बाबर यांना डावलून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. 2019 ला देखील पक्षाने त्यांना तिकीट देऊन त्यांच्यामागे ताकद उभी केल्याने त्यांना खासदारकीची दुसरी टर्म गाजवता आली. उध्दव ठाकरे यांना माणणा-या कट्टर शिवसैनिकांच्या पाठींब्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव केला. एवढी ताकद पक्षाने दिलेली असताना बारणे यांच्याकडून पक्षाला काय मिळाले ?, याचा विचार केला तर निरर्थक ठरेल. त्यामुळे बारणे यांनी शिंदे गटात सामिल होऊन शिवसेनेशी आणि उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये केली जात आहे.
बळीचा बकरा होण्याच्या भीतीपोटीच बंड
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली. अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या शब्दासाठी मावळ मतदार संघ पार्थ पवार यांच्यासाठी सोडावा लागण्याचे संकेत खासदार बारणे यांना मिळाले आहेत. त्यावर अनेकदा राजकीय चर्चा देखील घडवून आणल्या गेल्यात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली. जरी उमेदवारी मिळालीच तरी बळीचा बकरा होऊ नये, यासाठीच बारणे यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे लक्ष
खासदार बारणे यांची म्हणावी तेवढी ताकद नसली तरी पिंपरी-चिंचवडमध्ये काही कार्यकर्त्यांचा एक गट सक्रिय आहे. बारणे यांचे पुतणे माजी नगरसेवक निलेश बारणे, माजी आमदार एड. गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे बारणे याचे कट्टर कार्यकर्ते आहेत. बारणे यांच्यानंतर आता हा गट बंडखोरांच्या गोटात सामिल होणार का ?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.