राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कष्टक-यांना उबदार ब्लँकेट वाटप
पिंपरी – महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये पाल टाकून राहणाऱ्या कष्टकरी कामगारांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेते काशिनाथ नखाते, राजू बिराजदार, नाना कसबे, युवराज निलवर्ण, निरंजन लोखंडे, ओमप्रकाश मोरया, फरीद शेख, मनोज गुप्ता सह पदाधिकारी व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील मोशी, चिखली, भोसरी, रावेत येथे पाल ठोकून रहाणारे कष्टकरी कामगार व छोट्या मुलांचे थंडीपासून संरक्षण व्हावे या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नखाते म्हणाले, प्रचंड कामाची इच्छाशक्ती असलेले व सकाळी सहा वाजल्यापासूनच काम सुरू करत असणारे अजितदादा यांची कार्यतत्परता सबंध महाराष्ट्राला माहित आहे. रोखठोक निर्णय घेणे आणि होणारे काम होणारच आहे असे ठाम रहात विषय प्रलंबित न ठेवता ते जागेवर मार्गी लावणे याची ख्याती अजितदादा पवार यांची आहे . दिलेला शब्द ते निश्चितपणे पूर्ण करतात असे असे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणे गरजेचे आहे. अजितदादा यांनी जाहिरात फलकावरती खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम करण्यात यावे असे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम करण्यात आला.