‘ओबीसी’ आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर, शुक्रवारी (दि. 29 जूलै) सोडत निघणार
- राज्य निवडणुक आयोगाचे पिंपरी महापालिकेला आदेश
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक – 2022 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व महिला आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे. ओबीसी प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षण सोडत शुक्रवार दि. 29 जूलैला काढण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहे.
राज्यातील 13 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक 2022 तयारी सुरु आहे. त्यानूसार आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी 31 मे 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जमाती महिला 2 व पुरुष 1, अनुसूचित जाती महिला 11 व पुरुष 11, सर्वसाधारण महिला 57 अशा जागांवर आरक्षण सोडत काढण्यात आली होती.
मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण 50 टक्केच्यावर जाणार नाही, या मर्यादेत सर्वाेच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागास प्रवर्ग यांना जागा राखून राजकीय आरक्षण देण्यात येणार आहे.
असा असेल आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
26 जूलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यास करण्याकरिता जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे.
29 जूलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यास सोडत काढण्यात येणार आहे.
30 जूलैला आरक्षण सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर 30 जूलै ते 2 आॅगस्ट पर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात येईल.
5 आॅगस्टला आरक्षण निश्चित प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.