कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची जिल्हा प्रशासनाकडून तयारी
पुणे – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त बाधित होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याबाबत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सहा हजार १७५ बेड॒स आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. तसेच, तीन महिन्यांसाठी लागणारा आवश्यक औषधसाठा ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुले आणि तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सने लहान मुलांसाठी पायाभूत आणि आरोग्य सुविधा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ‘माझे मूल-माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून राज्याला आरोग्य सुविधांबाबत मनुष्यबळासाठी वेगळा निधी उपलब्ध होणार नाही. परंतु आरोग्य विभागातील कर्मचारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. भूलरोग तज्ज्ञांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी उपलब्ध होइल. इतर मनुष्यबळ भासल्यास स्थानिक निधीमधून खर्च करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. पुरेसा औषधसाठा ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. औषधे, इतर साधनसामुग्रीसाठी महापालिका, सीएसआर आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुलांसह त्यांच्या पालकांनीही खबरदारी घ्यावी.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी