व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक
पुणे – पुणे वन विभागाने व्हेल माशाच्या (Whale Fish) उलटीची (Vomit) तस्करी (Smuggling) करणाऱ्या सहा जणांना अटक (Arrested) केली आहे. त्यांच्याकडून तीन किलो उलटी जप्त करण्यात आली आहे.
मुहमदनईन मुटमतअली चौधरी (वय ५८), योगेश्वर सुधाकर साखरे (वय २५ रा. बालेवाडी), अनिल दिलीप कामठे (वय ४५, रा. फुरसुंगी), ज्योतिबा गोविंद जाधव (वय ३८), कृष्णात श्रीपती खोत (वय ५९) आणि सुजाता तानाजी जाधव (वय ४४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवडमधील पूर्णा नगरमध्ये शनिवारी ही कारवार्इ करण्यात आली.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, व्हेल माशाची उलटी विक्री करणारे अज्ञात इसम येणार असल्याचे समजले. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा व वन कर्मचारी यांनी बनावट ग्राहक बनून अज्ञातांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून व्हेल माशाची तीन किलो उलटी एक कार जप्त करण्यात आली आहे.
पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) राहुल पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल महेश मेरगेवाड, विजय शिंदे, वनरक्षक सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण आणि गणेश पाटील यांनी ही कामगिरी केली आहे.
हॅलो फॉरेस्ट –
आपल्या परिसरात कोणतेही वन्यजीवांची तस्करी अथवा शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ देण्यात यावी. तसेच हॅलो फॉरेस्ट टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले.