भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांनाच संपवतो, शरद पवार यांचा खळबळजनक आरोप
मुंबई – देशात सध्या राजकीय उलथापालथ होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असा खळबळजनक आरोप पवार यांनी केला आहे.
पंजाबमधील शिरोमणी अकाल दलाचे उदाहरण देत अकाली दलाला भाजपनेच संपवल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं. यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.”
“भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. कारण पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे,” असा आरोप शरद पवारांनी केला.
दरम्यान, बिहार भाजपाचे नेते सुशील मोदी यांनीही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय. ते म्हणाले, “भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला. महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला.”