पाठीत खंजीर खुपसणा-या शिवसेनेला धडा शिकवा – चंद्रकांत पाटील
मुंबई – “पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे.” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला चुचकारले आहे. तसेच, अरविंद सावंत यांनी भाजपाची मदत न घेता मुंबईत खासदार होऊन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, भाजपा यापुढे आपल्या बरोबर प्रामाणिकपणे राहिलेल्या, आरपीआय, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, विनायकराव मेटे यांची शिवसंग्राम, विनय कोरे यांची जनसुराज्य या पक्षांच्या आधारे संघटन वाढवून आम्ही आमच्या जीवावर सरकार आणू. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये आम्हाला कोणता पक्ष लागत नाही. त्यामुळे यापुढे विश्वासघात पुरे. काय होतं यांचं विदर्भात, काय अस्तित्व होतं शिवसेनेचं मराठवाड्यात ? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांनी हाताला धरून आणलं. जागांचं वाटप केलं, जागा विजयी केल्या.
आता त्यांचे अरविंद सावंत म्हणत आहेत, की दादांचं डोकं खराब झालंय. जसं काय हे डॉक्टरच आहेत. कधी म्हणतात यांच्या पोटात दुखतं सरकार न आल्याने, कधी म्हणतात डोकं बिघडलयं.. हे डॉक्टर आहेत का? मी काल अरविंद सावंत यांना जाहीरपणे म्हटलो आज पुन्हा म्हणतोय भाजपाशिवाय मुंबईत खासदार होऊन दाखवा. मग कळेल भाजपाची काय ताकद आहे.”
भाजपाने केंद्रात व राज्यात काय केलं आहे हे लोकांपर्यंत पोहचवलं पाहिजे. ते काय करत नाहीत, हे लोकांना सांगितलं पाहिजे. जे करत नाहीत त्यासंबंधी आंदोलनं केली, रोज एकतरी युनिटंचं निवेदन सरकारला गेलं पाहिजे. वर्तमानपत्रात प्रसिद्धी झाली पाहिजे. दर आठवडाभराने धऱणं आंदोलन केलं पाहिजे. उपोषण, साखळी उपोषण केलं पाहिजे. घेराव घाला, या सरकारला सळो की पळो करून सोडा.” असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सांगितले.