भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई शहराध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड
मुंबई – भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्ष नेतृत्व जातीय समीकरणाचा तोल राखण्यासाठी ओबीसी चेहऱ्याला संधी देईल अशी चर्चा होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे व राम शिंदे या ओबीसी नेत्यांची नावं आघाडीवर होती. यामध्ये आता बावनकुळे यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षाने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे व भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. भाजप आमदारांची संख्या अधिक असून देखील पक्ष नेतृत्वाने मराठा समाजाचे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राम्हण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. अशातच बावनकुळे यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा देत जातीय समीकरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाने केला आहे.
२०१९ मध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व मराठा नेते रावसाहेब दानवे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्र भाजपला आणखी एक मराठा नेता प्रदेशाध्यक्ष म्हणून लाभला होता. पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद व फडणवीस यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळात मंत्रिपद अशा दोन्ही जबाबदाऱ्या देत पक्षाने आपल्याच ‘एक नेता एक पद’ धोरणाकडे कानाडोळा केला होता.
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांची मोठी फळी आहे. मराठा समाजा हा या पक्षांचा पारंपरिक मतदार असल्याचं मानलं जात. तर दुसरीकडे भाजपने ओबीसी नेत्यांना ताकद देत ओबीसी समाजाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न वेळोवेळी केल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
महाराष्ट्रात ३८ टक्के ओबीसी समाज
महाराष्ट्रात ओबीसी मतदारांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानुसार राज्यातील ओबीसी लोकसंख्या 38-40 टक्के आहे. तर 33 टक्के मराठा समाज आहे.
राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचा उदय
गेल्या काही वर्षांमध्ये भाजपला मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यात यश आल्याचं पाहायला मिळतंय. विशेषतः मराठवाड्यात यामध्ये भाजपला मोठं यश मिळालं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 288 जागांपैकी 106 जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यातील एकूण 48 जागांपैकी 23 जागा जिंकल्या.