तृतीय पंथीयांच्या बचत गटामार्फत होणार पालिकेच्या कर संकलनाचे कामकाज, आयुक्तांचा निर्णय
पिंपरी – आंतरलिंगी लोकांच्या सक्षमीकरणाचे पुढचे पाऊल म्हणून महापालिकेच्या करसंकलन विभागातील मालमत्ता कर आकारणी व वसुली विषयक कामे आंतरलिंगी (ट्रान्सजेंडर) लोकांच्या बचत गटास देण्याच्या विषयाला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.
महापालिका सभा, विधी समिती आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या बैठकीमध्ये स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांच्या सुमारे २९ कोटी १२ लाख ६४ हजार रुपये खर्चास प्रशासक पाटील यांनी मंजुरी दिली. या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे मालमत्ता कर आकारणी रजिस्टरला नोंद असलेल्या मालमत्ताधारकांचे मालमत्ता कर थकबाकी गोळा करून महापालिकेच्या कर संकलन विभागीय कार्यालयाच्या कोषागारात जमा करण्यासाठी समाज विकास विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आंतरलिंगी व्यक्तींच्या बचत गटांना हे काम देण्यात येणार आहे. सुरुवातीला हे काम ३ महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे काम पाहून निविदा न मागविता थेट पद्धतीने हे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. या विषयास महापालिकेच्या स्थायी समितीची आवश्यकता होती त्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
महापालिका सभेची मान्यता आवश्यक असणा-या विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली. यामध्ये महापालिकेचे आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर हे सहा महिने कालावधीसाठी प्रभाकर पवार थीएटर वर्कशॉप कंपनी चिंचवड यांना प्रायोगिक तत्वावर चालविण्यासाठी देण्याच्या विषयाला, सफाई संवर्गातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीसह अनुकंपा धोरण लागू करण्याच्या विषयाला तसेच महापालिकेला सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या विषयांना महापालिका सभेमध्ये प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.
तसेच स्थायी समितीची मान्यता आवश्यक असणा-या विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली . यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागास स्मृतीचिन्ह साहित्य खरेदीसाठी ४३ हजार रुपये खर्चास, आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्रमांक १४ ज्ञानेश्वर कॉलनी, तुळजा भवानी मंदिर, त्रिमूर्ती हॉल, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, व इतर परिसरातील जलनि:सारण नलिका टाकण्यासाठीच्या सुमारे २० लाख रुपये खर्चास, चिंचवड केंद्रांतर्गत प्रभाग क्रमांक १९ मधील रिवर रोड, पिंपरी मार्केट, लिंक रोड, भाटनगर, निराधारनगर, भीमनगर, संतोषनगर, विजयनगर, आनंदनगर, झोपडपट्टी व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे व जलनिसारण नलिका टाकण्यासाठी ३५ लाख २९ हजार रुपये खर्चास, तसेच जल शुद्धीकरण केंद्र चिखली येथे नजीकच्या उच्चदाब फिडर वरून तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी अनामत रक्कम व पर्यवेक्षण शुल्क अदा करण्यासाठी ६० लाख ८० हजार रुपये खर्चास, भोसरी कासारवाडी येथील मंजूर विकास योजनेतील १२ मीटर रस्त्याने बाधित क्षेत्र खाजगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी १ लाख रुपये खर्चास, कर आकारणी व करसंकलन विभागाच्या दुबार मालमत्ता हस्तांतरण प्रकरणांचे हस्तांतरण फी आकारणीबाबतच्या विषयास स्थायी समितीची मान्यता आवश्यक होती, त्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
प्रभाग क्रमांक २० मधील स्मशानभूमीची उर्वरित स्थापत्य विषयक कामे करण्यासाठीच्या विषयास बैठकीत मान्यता देण्यात आली.