काळेवाडी, रहाटणीमध्ये साथीच्या आजाराने घातले थैमान, नागरिक संकटात
- महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी
- राष्ट्रवादी युवक चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे यांची मागणी
पिंपरी / महाईन्यूज
सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंगू व इतर जीवघेण्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे काळेवाडी, रहाटणीमधील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना या रोगराईतून मुक्त करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे यांनी केली आहे.
यासंदर्भात कुणाल थोपटे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या रहाटणी, काळेवाडीसह इतरत्र डेंगू सदृश्य लक्षणे असलेले ताप, अंगदुखी, सर्दी, पडसे, डोकेदुखी व इतर साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सरकारी व खासगी दवाखान्यात अशा रुग्णांची संख्याही वाढली आहे. विशेषता काळेवाडी, रहाटणी परिसरात अंतर्गत रॊस्त्यांची कामे सुरू असल्याने रस्त्यालगत अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यावर डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे आणि साथीच्या आजारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
—————–
कोरोनाचे संकट डोक्यावर असतांना आता डेंग्यू व इतर साथीच्या आजारानी नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेले साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गल्लोगल्ली धूर फवारणी तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देवून ठोस उपाय योजना महापालिकेने कराव्यात. तसेच साथीचे रोग वाढणार नाहीत, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
अध्यक्ष कुणाल थोपटे, चिंचवड विधानसभा, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस