कोथुर्णे बलात्कार प्रकरणाचे पडसाद विधीमंडळात, चिमुकलीला न्याय द्या – आमदार सुनील शेळके

मुंबई – मावळ तालुक्‍यातील कोथुर्णे गावात एका सात वर्षीय मुलीचे अपहरण करून खून केल्याची दुर्दैवी घटना 2 ऑगस्टला घडली. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत. या चिमुकलीला न्याय द्या, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. तसेच गावा-गावातील अवैध धंदे बंद करा, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे.

यासंदर्भात आमदार शेळके हे विधिमंडळात बोलताना म्हणाले की, मावळातील कोथुर्णे गावात माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर येथील पीडित कुटुंबास अनेकांनी भेट देऊन मदतीचे आश्‍वासन दिले. मात्र यासंदर्भात अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही.

या घटनेतील चिमुकलीला जर न्याय द्यायचा असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा व त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी. तसेच आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. या दुर्दैवी घटनेमागचे कारण गावा – गावात सुरू असलेले अवैध दारू धंदे आहेत. या दारू धंद्यांनी अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. आपण देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना गावा गावांमध्ये वीज, पाणी नाही; मात्र प्रत्येक गावात दारू धंदे आहेत.

जर या दुर्दैवी घटनेतील चिमुकलीला न्याय द्यायचा असेल तर गावांमधील अवैध दारू धंदे पहिले बंद करावेत, अशी मागणी आमदार शेळके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अनेक समजिक संस्था व दानशुरांनी पीडित कुटुंबास आर्थिक मदत केली. मात्र या घटनेला 15 दिवस झाले असले, तरीदेखील अद्याप सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. पण मुख्यमंत्री लवकरच मदत करणार असल्याचा मेसेज मोबाइलवर आला आहे. मात्र तो दिवस कधी उगवणार आहे, हे आम्हाला माहीत नाही असे देखील शेळके म्हणाले.

अदिती तटकरेंनी देखील मांडली भूमिका

आमदार शेळके यांच्या वक्तव्यानंतर आमदार अदिती तटकरे यांनी देखील याबाबत वक्तव्य करत शासनाकडून या कुटुंबास महिला बालकल्याण विभगाच्या अंतर्गत मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत होणे गरजेचे होते. तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन्यथा पीडित कुटुंबावर नैराश्‍य येते, असे मत मांडले.

Share to