निवडणूक घेऊन निवडला जाणार काँग्रेस कार्यकारणी अध्यक्ष

मुंबई – कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रतिनिधींची मतदार यादी तयार झाली आहे. त्यानुसार आता कॉंग्रेस कार्यकारीणी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची निश्‍चीत तारीख जाहीर करेल अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी दिली. ते म्हणाले की आम्ही आमच्याकडून तयारी पुर्ण केली आहे.

आता निवडणूक तारखेचा निर्णय कॉंग्रेस वर्किंग कमिटी घेईल. दरम्यान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असली तरी पक्षाध्यक्षपदा विषयी राहुल गांधी यांची भूमिका अजून निश्‍चीत झालेली नाही, त्यांचे अजूनही तळ्यातमळ्यात सुरूच असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षाचा सन 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर त्यांना अनेक वेळा आग्रह झाला पण त्यांनी हे पद स्वीकारले नाही. काही सूत्रांच्या मते अजूनही ते हे पद घेण्यास तयार नाहीत. राहुल गांधी जो पर्यंत पक्षाध्यक्षपदासाठी तयार होत नाहीत तो पर्यंत सोनियांकडेच पक्षाध्यक्षपद ठेवावे असे मत पक्षातील काही जणांनी व्यक्त केले आहे. त्यांना दैनंदिन कामकाच्या मदतीसाठी दोन ज्येष्ठ नेते मदतनीस म्हणून नियुक्त करण्याच्या पर्यायावरही विचार केला जाऊ शकतो.

सध्या देशात घराणेशाहीच्या विरोधात वातावरण आहे त्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी हे पद स्वीकारण्यास कितपत तयार होतील याची शंकाच आहे. पक्षाध्यक्षपदाच्या बाहेर राहुन राहुल गांधी यांनी सक्रियपणे पक्षाचे नेतृत्व केले आहे. पण ते जेव्हा पक्षाध्यक्षपद स्वीकारतील तेव्हा पुन्हा त्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका सुरू होईल त्यामुळे तोही एक मोठा धोका व्यक्त होतो आहे. 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या अवधीत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल असे सांगितले जात आहे.

गांधी घराण्याच्या बाहेर हे अध्यक्षपद दिले गेले तर पुन्हा या परिवाराला पक्षांवर नियंत्रण मिळवणे कठीण जाईल त्यामुळे राहुल गांधी यांनाच हे पद स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही असेही काहींचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांनी ठामपणे पुन्हा नकार दिलाच तर त्यांच्या ऐवजी कोणाला ही जबाबदारी मिळणार याचीही पक्षात चर्चा सुरू झाली आहे असे सांगितले जात आहे. अशा वेळी अशोक गहलोत, मल्लिकार्जून खरगे, मुकुल वासनिक, कुमार सेलजा अशा नावांचाही विचार होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.

Share to