बाप्पांच्या निरोपासाठी विसर्जन घाटावर कृत्रिम हौद तयार करावेत – सुजाता पालांडे
– विसर्जन घाटावर पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य हवे
– आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली मागणी
पिंपरी (प्रतिनिधी) – कोविड संक्रमणाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असताना विसर्जन घाटांवर चोक व्यवस्था करण्याची गरज आहे. गणेश मंडळ किंवा घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात येणा-या शहरातील वेगवेगळ्या घाटांवर, महापालिका उद्यान तसेच मैदानांवर कृत्रिम विसर्जन हौद बांधण्यात यावेत, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुख सौ. सुजाताताई पालांडे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. गणेश मंडळांनी मिरवणुकीसाठी ढोलताशा पथकांची जय्यत तयारी केली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर हा उत्सव साजरा करण्याची संधी मिळतेय. हा उत्सव साजरा होत असताना इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा होणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आपले काम आहे. तरी आपण शहरातील गणेश मंडळांना इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करावे. त्यामुळे पर्यावरणास पोषक अशी नियमावली तयार करून त्याची प्रशासनामार्फत अंमलबजावणी करावी. जेणेकरून उत्सवादरम्यान होणारे प्रदूषण रोखले जाईल, असेही सुजाताताई पालांडे यांनी म्हटले आहे.