घरभाडे मागितले म्हणून घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून खली ढकलले
पिंपरी / महाईन्यूज
आठ महिन्याचे थकीत घर भाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला टेरेसच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी भाडेकरू कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत घरमालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सौरभ पोरे असं जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात तक्ररदार यांची चार मजली इमारत आहे. ते स्वतः त्या ठिकाणी राहत असून आरोपी कुटुंब देखील बऱ्याच दिवसांपासून तेथे राहत आहे. दरम्यान, आठ महिन्याचे भाडे थकल्याने दोन दिवसांपूर्वी घरमालकाचा मुलगा सौरभ आणि त्याचे वडील ते मागण्यासाठी गेले होते. तेव्हा, त्यांना भाडेकरूंनी चौथ्या मजल्यावरच्या टेरेसवर बोलावले. तिथे भाडेकरू कुटुंब आणि त्यांच्यात वाद झाले. या दरम्यान भाडेकरूने घरमालकाचा मुलगा सौरभ याला खाली ढकलून दिले आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे. यात, सौरभ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
भाडेकरू कुटुंबात १५ वर्षीय मुलगी राहात असून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिचा जखमी सौरभने विनयभंग केला होता. त्याची तक्रार नुकतीच सांगवी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्याच्या एक दिवसानंतर सौरभला टेरेसवरून खाली ढकलून देण्याची घटना घडली आहे. याचा परस्पर काही संबंध आहे का ? याचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.