यंदा पालिका देणार वैद्यकीय सुविधांवर भर

  • मोशीत 750 खाटांचे रुग्णालय
    – नेत्र रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होणार
    – पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा

पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महापालिका यावर्षी मोशी येथे 750 खाटांचे अद्यावत रुग्णालय उभारणार आहे. यासह चिंचवडमधील नवीन तालेरा, थेरगाव, जिजामाता, नेत्र, भोसरी रुग्णालयासह यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये चालू आर्थिक वर्षात अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन योजनांचा 2023-24 च्या अंदाजपत्रकात समावेश केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात मोशी भागातील रहिवासी परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता या भागातील लोकांना दर्जेदार वैद्यकीय सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेने 750 खांटाचा दवाखाना उभारण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी आरक्षित 6 हेक्‍टर जागेचा ताबा मिळत नव्हता. आजअखेर पूर्ण जागा ताब्यात आली आहे. भविष्यात याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे. अद्यावत रुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी स्थापत्य विभागाच्या लेखाशीर्षावर भरीव तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या साडेतीन वर्षांपासून मासूळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयाची इमारत धूळखात पडली आहे. त्यामध्ये अत्याधुनिक उपकरणांनी युक्‍तअसे नेत्र रुग्णालय सुरू करण्याचा निश्‍चय पालिकेने केला होता. मात्र, करोना काळामध्ये याठिकाणी कोविड टेस्ट सुरू करण्यात आल्या. त्यानंतर जम्बो कोविड सेंटरमधील बेड्‌स, गाद्या, स्लाइन स्टॅण्ड आणि तत्सम वैद्यकीय साधनांचा याठिकाणी साठा केला. यामुळे रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीला गोदामाचे स्वरुप आले आहे. परंतु, 2023-24 च्या आर्थिक वर्षात हे नेत्र रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे.

तालेरा रुग्णालयात विविध सुविधा
चिंचवड येथील नवीन तालेरा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याठिकाणी मल्टीस्पेशालिटी सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तर, जुन्या तालेरा रुग्णालयामध्ये खास वृध्दांकरिता सुविधा दिल्या जाणार आहेत. पीपीपी तत्वावर कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, थेरगाव रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर, पूर्ण क्षमतेने सर्जरी, नेत्र विभाग, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात येणार आहेत.

आकुर्डी रुग्णालयात सुरू होणार विविध विभाग
आकुर्डी येथील कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयात डायलीसिस, सर्जरी व अस्थिरोग विभाग सुरू करण्यात येणार आहे. नवीन भोसरी रुग्णालयात एनआयसीयू, कान- नाक- घसा व सर्जरी विभाग सुरू करण्यात येणार आहे. वायसीएम रुग्णलयात देखील अद्यावत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तर, पालिकेच्या सर्वच रुग्णालयात दंतचिकित्सक सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. वायसीएममध्ये अत्याधुनिक डेंटल सुविधा सुरू करण्यात येणार आहे. तसेच, महापालिका नवीन एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन स्क्रीनिंग आणि डायग्नोस्टिक्‍स सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

Share to