विविध विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने साकारलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन रविवारी (दि. 19) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
महापालिकेच्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय हॉस्पिटलचे उदघाटन रविवारी (दि. 19) होणार आहे. प्रभाग क्र. 9 (जुना प्रभाग क्र. 28) मासुळकर कॉलनी, पिंपरी (आरक्षण क्र. 85) नागरी आरोग्य केंद्र व नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार आहे. साडेदहा वाजता भोसरीच्या गवळीमाथा येथील कचरा हस्तांतरण केंद्राचे उद्घाटन होणार आहे. तर, सकाळी अकरा वाजता कासारवाडी येथील कचरा हस्तांतरण केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
शंकरराव मासुळकर आय हॉस्पिटल हे पदव्युत्तर संस्था, वायसीएम रुग्णालयाशी संलग्नित राहणार असल्यामुळे एम एस-ऑपथालमोलॉजी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम, कौशल्य प्रयोगशाळा, संशोधन केंद्र याकरिता रुग्णालयाचा वापर होणार आहे.