पालिकेकडून 700 कोटींचा मालमत्ता कर वसूल

  • एक हजार कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
  • ऑनलाईन पेमेंट सुविधेचा यशस्वी वापर
  • जप्तीची कारवाई सुरुच राहणार

पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – चालू आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेने 700 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. वर्षभरात नागरिकांना दिलेल्या सुविधा, सवलती आणि जप्तीच्या कारवाईमुळे करआकारणी व करसंकलन विभागाने हा वसुलीचा टप्पा गाठला आहे. तर, ऑनलाईन पेमेंट सुविधेद्वारे देखील मालमत्ता कर वसुलीत अपेक्षित वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी अवलंबलेल्या झिरो टॉलरन्स पॉलिसीमध्ये 13 हजार अधिपत्रे काढण्यात आली. त्यापैकी विभागाने थकबाकीदारांवर कठोर कारवाई करीत 1 हजार 200 पेक्षा मालमत्ता जप्त केल्या. महापालिकेने वसूलीची अवलंबलेली कडक कारवाई एप्रिल महिन्यामध्ये सुध्दा सुरु राहणार आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची एप्रिलपासून लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे. करसंकलन विभागाने ऑनलाईन पध्दतीमध्ये सुधारणा करुन नागरिकांना प्रत्येक सेवा सुलभ करण्यास प्राधान्य दिले. मालमत्ताधारकांशी संवादासाठी करसंवाद हा उपक्रम राबविला.
यासह महिला, दिव्यांग, तसेच पर्यावरण पुरक सोसायट्यांना कर सवलती दिल्या. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. परिणामी, चालू आर्थिक वर्षामध्ये विक्रमी 700 कोटींचा टप्पा पार करणे पालिकेला शक्‍य झाले आहे.

थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केल्यामुळे वसुलीत भर

नियमित कर जमा करणा-या प्रामाणिक करदात्यास करामध्ये विशेष सवलती दिल्या. तसेच, थकबाकीदारांना दंड ठोठावून त्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात आल्या आहेत. दंड आकारण्यात आलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. अनेक मालमत्तांचे नळ कनेक्‍शन बंद करण्यात आले आहे. सध्या एक लाखाच्या वरील थकबाकी असणा-या मालमत्ता धारकांची नावे प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. प्रामाणिक करदात्यांना सवलती व थकबाकीदारांना दंड या भूमिकेमुळे वसुलीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे करसंकलन विभागाने म्हटले आहे.

Share to