महावितरणची शहरात 35 कोटींची थकबाकी, तब्बल दीड लाख थकबाकीदार

  • 1 लाख 31 हजार 766 वीज ग्राहक आहेत थकबाकीदार

पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – तूट वाढत असल्याचे सांगून वीज दर वाढविण्याची सातत्याने मागणी करणारे महावितरण वसुली करण्यात सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. एकट्या पिंपरी-चिंचवड शहरात सव्वा लाखांहून अधिक ग्राहकांकडे महावितरणची 35 कोटीहून अधिकची थकबाकी आहे.

पिंपरी चिंचवड शहरात 1 लाख 1 हजार 35 घरगुती ग्राहकांकडे 18 कोटी 50 लाख रुपये, 16 हजार 935 वाणिज्यिक ग्राहकांकडे 8 कोटी 7 लाख रुपये, 4 हजार 796 औद्योगिक ग्राहकांकडे 8 कोटी 58 लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 1 लाख 31 हजार 766 वीजग्राहकांकडे 35 कोटी 15 लाख रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी आहे.

पुणे परिमंडलातील 6 लाख 36 हजार 541 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 146 कोटी 14 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये 5 लाख 49 हजार 397 घरगुती ग्राहकांकडे 93 कोटी 50 लाख रुपये, 75 हजार 47 वाणिज्यिक ग्राहकांकडे 33 कोटी 68 लाख रुपये तसेच 12 हजार 97 औद्योगिक ग्राहकांकडे 18 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी आहे.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्‍यांमध्ये 1 लाख 96 हजार 424 घरगुती ग्राहकांकडे 40 कोटी 16 लाख रुपये, 20 हजार 233 वाणिज्यिक ग्राहकांकडे 12 कोटी 25 लाख रुपये, 4 हजार 77 औद्योगिक ग्राहकांकडे 8 कोटी 52 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांनी त्वरीत थकबाकीचा भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी तसेच चालू वीजबिल नियमित भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाइलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135/138 नुसार कारवाई करण्यात येत आहे.

शनिवारी व रविवारी केंद्र सुरू
वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 18) व रविवारी (दि. 19) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. यासोबतच लघुदाब वीजग्राहकांना थकबाकी व चालू बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल ऍपद्वारे “ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

ग्राहक- संख्या – थकबाकी
घरगुती- 1 लाख 1 हजार 35- 18 कोटी 50 लाख रुपये
वाणिज्यिक-16 हजार 935- 8 कोटी 7 लाख रुपये
औद्योगिक – 4 हजार 796 – 8 कोटी 58 लाख  

Share to