युवक कॉंग्रेस घालणार आज मुंबईतील विधानसभा भवनाला घेराव
- प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांची माहिती
पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) – महागाई व बेरोजगारी वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे. कंपन्यांचे स्थलांतर होत असल्यामुळे नागरिकांच्या नोकऱ्या जात आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 21 मार्च) मुंबईत विधानसभा भवनाला घेराव घालण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश युवकचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले की, मोदी सरकारने पाशवी मतांच्या जोरावर प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरुन विरोधी पक्षातील नेत्यांना कोंडीत पकडले आहे. ईडी, सीबीआयचा वापर करुन निष्पाप व्यक्तींची चौकशी केली जात आहे. देशातील महागाई, बेरोजगारीवर मोदी सरकार काहीच बोलत नाही. उलट शासनाच्या दडपशाहीला जुगारण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला धमकी देऊन शांत केले जाते, ही वस्तुस्थिती आहे. भाजपाकडून अत्यंत खालच्या थरातील राजकारण केले जात आहे. याची केंद्र आणि राज्यातील सरकारला जाणीव करुन देण्यासाठी 21 मार्च रोजी मुंबईतील विधानसभेला घेराव घालण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून युवक कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असेही जाधव यांनी सांगितले आहे.