कर्मचारी संपामुळे आरटीओच्या कामांना ब्रेक, हजारो अर्ज प्रलंबित
पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) – ना हरकत दाखला, वाहन हस्तांतरण, आरसी बुक आदीसह विविध कामांसाठीचे येणारे हजारो अर्ज उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रलंबित राहत आहेत. कर्मचारी संपामुळे या कामांना ब्रेक लागला आहे. परिणामी वाहनधारक त्रस्त झाले आहेत. संप मागे घेतल्यानंतरही प्रलंबित अर्ज मार्गी लागण्यास अधिक वेळ लागणार आहे.
पेन्शनच्या मागणीसंदर्भात राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासले आहे. त्याचा परिणाम नियमित होणाऱ्या कामांवर पडत आहे. मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) देखील याला अपवाद राहिले नाही. आरटीओ मधील 100 टक्के कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे कार्यालयाकडून होणारी कामे खोळंबली आहेत. सध्या आरटीओ कार्यालयाकडून वाहतूक वाहन परवाना देण्याचे काम सुरू आहे. यासह शिकाऊ, परमनंट वाहन परवाना नोंदणी देखील केली जात आहे. मात्र लिपीकाकडील कामे खोळंबली आहेत.
लिपीकाकडून वाहनांचे हस्तांतरण करणे, ना हरकत दाखला देणे, डुप्लिकेट आरसी बुक देणे, कर्ज बोजा चढविणे, उतरविणे, वाहनातील बदल आदी महत्त्वाची कामे केली जातात. दिवसाकाठी सुमारे दीड हजार अर्ज त्यासाठी कार्यालयात जमा होत आहेत. अर्जांची संख्या पाहता आधीच दोन-तीन महिने नागरिकांना वाट पहावी लागत होती. त्यात आता आणखीनच भर पडली आहे. कर्मचारी संपावर गेल्याने हजारे अर्ज रखडले असून वाहनधारकांना आणखीन वाट पाहण्याची वेळ येणार आहे. संप मिटल्यानंतर नागरिकांची कामे मार्गी लागणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
कार्यालयातील 100 टक्के कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा कामावर परिणाम होत आहे. लिपिकांकडे विविध कामांसाठी अर्ज येत असतात. हे येणारे अर्ज प्रलंबित राहत आहेत. इतर कामे करून दिली जात आहेत.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी.