घरेलू कामगारांच्या सन्मानधनाच्या वयाची अट 60 करावी, घरेलू कामगारांची मागणी

पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धनासाठी वयाची अट 55 व दहा हजार रुपये लाभ मिळवण्यासाठी दोन वर्षाची पावतीची अट असल्यामुळे यात घरेलू कामगार लाभ घेऊच शकणार नाहीत. म्हणून वयाची अट 60 करावी व दोन वर्षांची पावती अट देखील रद्द करावी. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एक ते दोन महिन्यांची मुदत वाढ द्यावी, अशी मागणीही राज्य घरेलू कामगार समन्वय समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाने केली आहे. घरेलू कामगारांनी कामगार मंत्री आणि कामगार उपायुक्तांकडे केली.

दोन्ही संघटनांच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आणि कामगार उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या घरेलू कामगार कल्याण मंडळाअन्वये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 2011 पासून अस्तित्वात असलेल्या घरेलू कामगार यांना निर्णयानुसार वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत व मागील दोन वर्षे नोंदणी जीवित असलेल्या पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन दहा हजार रुपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलनासह पाठपुरावा केला आहे. मात्र यापूर्वी अनेक वेळा वयाची अट ही 50 ते 60 वर्षे असावे अशी मागणी करण्यात आली होती. करोना कालावधीत केल्याप्रमाणे नूतनीकरणाची अट या योजनेस शिथील करून सन्मानधन योजनेचा लाभ द्यावा. एप्रिल ते मे अखेरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ करून द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

राज्य घरेलू कामगार समन्वय समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या वेळी काशिनाथ नखाते, माधुरी जलमुलवार, आनंद आधार संघटनेच्या अनिता गोरे, लक्ष्मी जाधव, महेंद्र जैनजांगडे, शेनाज शेख, कौशल्या इजगज, कविता नाईक, महादेव गायकवाड आदी उपस्थित होते. या मागणीनंतर शासनाला पत्र पाठवून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन कामगार उपायुक्त गीते यांनी दिले.

Share to