थाळीनाद आंदोलनातून शिक्षकांनी पेन्शनच्या मागण्यांकडे वेधले लक्ष
– तहसिल कार्यालयावर घोषणाबाजी करून केले आंदोलन
पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) – जुनी निवृत्ती योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना व मुख्याध्यापक संघाकडून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी एकच मिशन जुनी पेन्शन, शिक्षक एकजुटीचा विजय असो, अशा घोषणाबाजी करुन थाळीनाद करत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
पिंपरी चिंचवड परिसरातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच क्रीडा संघटनांनी पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या आडमुठी धोरणाचा जाहीर निषेध व्यक्त केला. या वेळी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा समन्वयक प्राचार्य विक्रम काळे, सदस्य गोपीनाथ करंडे, अनिल गुंजाळ, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कैलास पवळे, सचिव मुख्याध्यापक संभाजी पडवळ, पिंपरी चिंचवड क्रीडा महासंघाचे अध्यक्ष निवृत्ती काळभोर, मुख्याध्यापक अजय रावत व सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी थाळी नाद आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
येत्या गुरूवारी 23 मार्च 2023 रोजी वाहनांना काळ्या फीत लाऊन आंबेडकर चौक पिंपरी ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अशा भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 24 मार्च रोजी माझे कुटुंब माझी पेन्शन या मोहिमेअंतर्गत सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबीयांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे, असे शशिकांत हुले म्हणाले.