शिराळा विधानसभेचा उमेदवार देशमुख की महाडिक ?
- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी वाढविला संभ्रम
प्रदीप लोखंडे : सांगली
आगामी निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार सत्यजित देशमुख असणार की सम्राट महाडिक असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. असा प्रश्न उपस्थित होण्याला निमित्तही तसेच आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळ्यात भाजपाचा गुरुवारी (दि. 23 मार्च) मेळावा पार पडला. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी देशमुख आणि महाडिक बंधू यांच्यात कोणतेच मतभेद नाहीत हे सांगायचा प्रयत्न केला. दोघेही भाजपा वाढवतील असेही पुढे ते म्हणाले. हे सांगताना दोघांचेही हात हातात घेऊन जनतेसमोर उंचावले. दोघेही मतदारसंघाचे महत्त्वाचे नेते असून कोणता नेता निवडायचा हे जनतेनेच ठरवावे, असे जणू संकेतच मंत्री सिंधिया यांनी दिले असल्याचे ते चित्र होते. केंद्रीय मंत्री सिंधिया यांची ही कृती उमेदवारीबाबत सध्या तरी संभ्रमात टाकणारी वाटते.
केंद्रातील मोदी सरकारने पाच वर्षात केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी लोकसभा प्रवास योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत केंद्रातील मंत्री आणि खासदारांना देशभर केंद्राच्या योजना पोचवण्याची जबाबदारी दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोदी सरकारच्या योजना पोचविणारा दूत म्हणून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया शिराळ्यात आले होते. पंतप्रधान मोदींची योजना घेऊन ते येतात म्हटल्यावर त्यांच्या दौऱ्याला आणि एकूणच राजकीय संकेतांना विशेष महत्व द्यावे लागेल. कारण हे दौरे करत असताना प्रत्येक मतदारसंघात आलेले अनुभव, वातावरण याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार यात तिळमात्र शंका नाही. त्यानंतर भाजपा देखील आपली रणनीती ठरवू शकते. त्यामुळे केंद्रीय मंत्री सिंधिया यांचा शिराळा दौरा विशेष महत्वाचा आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार आत्तापर्यंत तरी शिराळा तालुक्यातील झाला आहे. त्याला वाळवा तालुक्यातील 48 गावांची साथ मिळत आहे. शिराळ्यात आजी माजी आमदार नाईक बंधू यांच्या बरोबर सत्यजित देशमुख यांना मानणारा मतदार आहे. नाईक बंधूंच्या मतांचा गठ्ठा फोडण्यासाठी शिराळा तालुक्यातीलच उमेदवार देण्याचे प्रयत्न भाजपाकडून केले जाऊ शकतात. त्याचाच भाग म्हणून की काय शिराळ्यात भाजपाने सिंधियांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले. तिथले नियोजन देशमुखांच्या हाती दिले. त्या यशस्वी मेळाव्याचे क्रेडिट ही सत्यजित देशमुखांना जात आहे.
दुसऱ्या बाजूला सम्राट महाडिक यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना तिकीट दिल्यामुळे महाडिक यांनी अपक्ष अर्ज भरत रिंगणात उतरले होते. सध्या नाईक राष्ट्रवादीत गेल्याने आपल्याला तिकीट मिळेल यासाठी महाडिक फिल्डिंग लावताना दिसत आहेत. त्यांची वाळवा तालुक्यातील 48 गावात मोठी ताकद आहे. शिराळा तालुक्यात ते आपला गट निर्माण करत आहेत. त्यामुळे ते ही प्रबळ दावेदार ठरत आहेत. महाडिक यांच्या नियोजनाने वाळवा तालुक्यातील युवकांशी संवाद करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भाजपाचे झालेले हे दोनही कार्यक्रम आणि मंत्री सिंधिया यांच्या देशमुख-महाडिक यांना सोबत घेऊन हात वर करून दिलेल्या राजकीय संकेताला देखील विशेष महत्त्व आहे. याचा अर्थ हाच असू शकतो की देशमुख आणि महाडिक या पैकी एक उमेदवार विधानसभेला असू शकतो. दोघेही मजबुतीने एकमेकांच्या पाठीशी उभा राहतील. सध्या भाजपाची मदार या दोघांच्यावरच आहे. या पलीकडे आणखी कोणतेच अर्थ त्या संकेतांमधून निघतील अशी शक्यता नाही. दोघांच्यात वाद नाही हे सांगताना मंत्री सिंधिया यांनी दोघांनाही जनतेसमोर उभे केले. मतदारसंघातील जनतेलाच पुढे काय ते ठरविण्याचा तो प्रकार आहे.
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
- मो. नं : 7350266967