आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविणे हाच उद्देश – डॉ. पवन साळवे

पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शहरी भागाकरीता रुग्णांना लागणाऱ्या सर्व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देणे व महापालिकांमधील सर्व सुविधांचे बळकटीकरण करून आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविणे हा आरोग्यविषयक कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले.

महापालिकेच्या वतीने पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृह येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा दिवस, जागतिक महिला दिवस, जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा तसेच आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर उपचार घेण्यासाठी मदत व्हावी, नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक होऊन गंभीर आजारांना आळा घालू शकतील. यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. संगीता तिरुमणी, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुनिता साळवे, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. तृप्ती सागळे, स्टाफनर्स, ए. एन. एम, आशा वर्कर, एन. टी. इ. पी, क्षयरोग अधिकारी व कर्मचारी, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्‍निशियन उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये महापालिकेचे रुग्णालय, वैद्यकीय विभाग कक्ष, कुष्टरोग विभाग क्षयरोग विभाग प्रमुख प्रतिनिधींना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन्मान चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय विभागातील महिलांनी नृत्य, गाणी, महिला सक्षमीकरणावरील कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका सर्वज्ञ व शोभा ढोले यांनी केले.

Share to