शिरगावचे सरपंच प्रविण गोपाळे यांचा खून

पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रविण साहेबराव गोपाळे (वय ४७) यांचा धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. शिरगावमधील साई मंदिरासमोर शनिवारी(दि.१) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या होत्या. यामध्ये शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी त्यांची निवड झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळे यांचा जमीन- खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. यामधून काही जणांशी त्यांचा वाद झाला होता. शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ते शिरगावमधील साई मंदिरासमोर गप्पा मारत उभे होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी गोपाळे हे त्याठिकानातून ते पळत असताना हल्लेखोरांनी पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर वार केले.यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. उपचाराकरिता गोपाळे यांना सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरपर्यत शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Share to