रयतच्या वतीने जागतिक तृतीयपंथी ओळख दिन साजरा
पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी) – जागतिक तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच व रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात ठसा उमटविणा-या तृतीय पंथियांचा सन्मान करण्यात आला.
काळेवाडी, नढे नगर येथील रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या तृतीयपंथी बांधवांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. तृतीयपंथींना आर्थिक सक्षम करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता दलजीत सिंग यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सिद्धी कुंभार व रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथी बांधवांच्या सक्षमीकरणाकरिता सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्ष रितिका परमार, सदस्य रिद्धी जाधव, आरोही राठोड, रोहिणी मोरे, गायत्री थेरगावकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, राज्य समन्वयक श्वेता ओव्हाळ, सहसचिव भाग्यश्री आखाडे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप, रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा भोरकडे, खजिनदार निलेश पवार, सचिव सिद्धी कुंभार, उपाध्यक्ष रितिका परमार आदी उपस्थित होते.