परिमंडळ अ आणि ज कार्यालयांची विभागणी करा
- माजी उपमहापौर शैलजा मोरे यांची मागणी
- निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी) – अन्नधान्य पुरवठा व वितरण विभागाची पिंपरी-चिंचवड परिमंडळ अ आणि ज ही कार्यालये एकत्रित केल्यामुळे त्यावर पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही विधानसभेतील सुमारे 25 लाख लोकसंख्येचा भार पडत आहे. त्यामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी परिमंडळाच्या अ आणि ज कार्यालयांची विभागणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या माजी उपमहापौर शैलजा अविनाश मोरे व अन्न नागरी पुरवठा समिती सदस्य वैभवी घोडके यांनी केली आहे.
यासंदर्भात पुण्यातील निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे व अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने यांना दिलेल्या निवेदनात मोरे यांनी म्हटले आहे की, निगडी प्राधिकरणात पिंपरी-चिंचवड परिमंडळ अ आणि ज यांची वेगवेगळी विभागणी केली होती. मात्र, या दोन्ही कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयावर पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही विधानसभांचा भार पडू लागला आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयातील कर्मचा-यांवर ताण पडला आहे. दोन्ही विधानसभांमध्ये सुमारे 25 लाख लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे कामकाज खूपच संथ गतीने केले जात आहे. यामुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. वेळेत काम होत नसल्यामुळे नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वाद होतात.
नागरिकांची गैरसोय टाळून प्रशासकीय कामकाज सुटसुटीत करण्यासाठी अ आणि ज याचे दोन वेगवेगळे विभाग तयार करावेत.कामाची विभागणी केल्यास दोन्ही कार्यालयांवर लोकसंख्येचा ताण पडणार नाही. नागरिकांना कमी वेळेत चांगली सेवे देणे सोपे होईल, अशी मागणी सौ. शैलजा अविनाश मोरे,वैभवी घोडके अन्न नागरी पुरवठा समिती सदस्या यांनी निवेदनाद्वारे केली आहे