आत्मकेंद्रीत न राहता समाज हित जोपासावे : अभिनेते मिलिंद शिंदे
प्रभाग 2 मधील बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित धम्म संध्या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व यश फाऊंडेशनच्या वतीने आयोजन
पुणे : प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खडतर परिस्थिती असणाऱ्या व्यवस्थेवर मात करून अडचणींचे दगड फोडले. सर्वसामान्य नागरिकांसाठी सुपिक जमिन तयार केली. त्यामुळे गोरगरिब नागरिक प्रगतीच्या शिखरावर पोचले आहेत. मात्र प्रगती होताच आत्मकेंद्रीत झालेल्या समाजबांधवांना समाजाचे हित दिसत नाही. ज्यांच्या ऋणामुळे आपल्या आयुष्यात चांगले दिवस आलेत. ते लक्षात घेता समाजाचे देणे लागतो या उद्देशाने समाजकार्यात हातभार लावायला हवा. लहान मुलावर धम्माचे संस्कार रूजवा. त्याला चांगला माणूस घडवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले.
येरवडा प्रभाग क्रमांक 2 येथे बुद्ध जयंतीनिमित्त धम्म संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व यश फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लुंबिनी उद्यान समतानगर, नागपुरचाळ, येरवडा येथे आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
माजी आमदार तथा भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, रिपाईचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, माजी नगरसेवक आयुब शेख, अशोक कांबळे, भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, बाबुराव घाडगे, शाम सदाफुले, ऍड भगवान जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते. वडगाव शेरी मतदार संघातील सामाजिक मंडळे, विविध बुद्ध विहाराचे पदाधिकारी, महिला मंडळ, विद्यार्थी, नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या व तिच्या वाटेवर आपल्याला मार्गस्थ केले आहे भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे आपण पाईप आहोत विचार जन माणसात रुजवणे आपले कर्तव्य आहे यासाठी प्रभागात मी सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन करतो यासह पुणे आणि पुणे परिसरात देखील विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवून गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या लढ्याचा भाग होण्याचा प्रयत्न करतो. त्याच उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.
मुख्य आयोजक माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थित मान्यवरांचा पंचशिलेची शाल व गुलाब पुष्प भेट सन्मान केला.
पार्श्वगायक संघपाल तायडे, अहो शेठ लय दिसान झालीय भेट फेम पार्श्वगायिका सोनाली सोनवणे अन्य गायकांनी बुद्ध भीमगीते सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भंदत नागघोष महाथेरो, व भिखु संघानी सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक दीपक मस्के यांनी केले. जन्मोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी यश फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.