भक्ती-शक्ती येथील भूखंड मोकळा ठेवा, राज्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी

पिंपरी- भक्ती-शक्ती चौक, निगडी पेठ क्र.२४ हा संपूर्ण भूखंड शिवजयंती व सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करण्यासंदर्भात सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली.

​पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौक येथे पुणे महानगर अखत्यारीत असलेल्या भूखंडापैकी काही क्षेत्राचे नुकतेच वाटपकरण्यात आले आहे. सदर भूखंडावर अनेक वर्षांपासून अनेक महापुरुषांच्या जयंतीचे / उत्सवांचे कार्यक्रम केले जातात. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती, मोहम्मद पैगंबर जयंती त्याठिकाणी सार्वजनिकरित्या साजरी केली जाऊ शकते. तसेच निगडी गावठाणचा जत्रा महोत्सव, किर्तन सप्ताह, राजकीय ,अध्यात्मिक, साहित्य सभा संमेलने, कामगार मिळावे व सर्व राजकीय पक्षांच्या सभा होण्यासाठी हा भुखंड खुला राहणे शहर विकासासाठी महत्त्वाचे आहे. इतर वेळी या खुल्या भूखंडाचा वापर मुलांना खेळण्यासाठी मैदान म्हणून देखील होऊ शकतो.

विश्यांकित भूखंड हा पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नियोजन क्षेत्रात होता व प्राधिकरणाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत हा भूखंड मोकळाच आहे. सदर भूखंड शहरातील प्रमुख अश्या भक्ती-शक्ती शिल्पसमूहालगत आहे व जगदगुरु संत तुकाराम महाराज देहू – पंढरपूर या पालखीमार्गावर आहे. पीएमआरडीए मार्फत सदर भूखंडाचे प्लॉट पाडून त्यातील काही क्षेत्र विक्री करण्यात आले आहे. परंतु निगडी परिसरातील नागरिक व प्रामुख्याने वारकरी मंडळी आणि शिवभक्त यांचा व शहरातील सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक मंडळांचा या भूखंड विक्रीला तीव्र विरोध आहे. पीएमआरडीएने सदर भूखंड विक्री रद्द करून सदरचे भूखंड हे सार्वजनिक वापराचे प्रयोजनासाठी राखीव ठेवावा अशी सर्वांचीच मागणी आहे.

सद्यस्थितीत भूखंड विक्री व त्यास होणाऱ्या सार्वजनिक विरोध लक्षात घेता सदर प्रकरणी समाजहिताचा तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील भक्ती-शक्ती चौक ते नव्याने निर्माण होत असलेल्या रावेत उड्डाणपूल या ४५ मी. रस्त्यालगत सेक्टर क्र. २६ येथे सार्वजनिक सुविधा (PUBLIC AMENITY) यासाठी आरक्षित भूखंड आहे व प्राधिकरणाने सदर आरक्षणाखालील क्षेत्र हे महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेले आहे. भक्ती – शक्ती येथील रोटरी उड्डाणपूलाचे काम सुरु असताना या भूखंडाचा वापर कंत्राटदाराद्वारे सुरु होता. उड्डाणपूलाचे काम संपल्याने ते क्षेत्र आता रिकामे झाले आहे. तरी सार्वजनिक हित लक्षात घेता महानगरपालिका आणि पीएमआरडीएने या दोन्ही भूखंडावरील वापरातील प्रयोजनाचे अदलाबदल केल्यास योग्य तोडगा निघू शकेल.

वरील प्रस्तावाचा विचार आपण तातडीने गांभीर्याने करावा जेणेकरून नागरिकांच्या मागणीचा व भविष्यात पालखीमार्गावर आवशक्यत असणारे मोकळे क्षेत्र उपलब्ध होईल. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आम्ही सदरचा तोडगा मांडत आहे. परंतु नागरिकांची मागणी मान्य न करताच भक्ती – शक्ती चौकातील भूखंड बिल्डरांच्या घश्यात घालण्याचा प्रकार झाल्यास आम्हाला कठोर जन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल याची नोंद आपण गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देण्यासाठी मारुती भापकर , शिवाजी साळवे , सचिन चिखले , धनाजी येळकर , गणेश भांडवलकर , शिवाराज गडदे, संजय जाधव , सचिन उदागे , रोहीदास शिवणेकर आदी उपस्थित होते

Share to