पिंपळे सौदागरच्या त्या १८ मीटर रुंद रस्त्याच्या कामाला संरक्षण विभागाचा हिरवा कंदील
- सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांच्या पाठपुराव्याला यश
- रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापलिका आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठक संपन्न
पिंपरी (दि. ९) :- कासारवाडीतून पिंपळे सौदागरकडे जाताना नाशिक फाटा बीआरटी मार्गालगतच्या हॉटेल क्रिस्टल ते ट्रॉइस सोसायटीकडे येणाऱ्या १८ मीटर रुंद रस्त्याच्या कामाला संरक्षण विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत महापालिका अधिकारी व संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली. त्यात रस्त्यासाठी महापालिका संरक्षण खात्याला रक्कम अदा करून रस्त्यासाठी भूसंपादन करणार आहे. लवकरच हा करार संपन्न होऊन महापालिका १८ मीटर रुंद प्रशस्त रस्त्याची निर्मिती करणार आहे. त्यामुळे हॉटेल क्रिस्टल हट्स लगतच्या काटे वस्ती, ट्रॉइस सोसायटी आणि परिसराची वाहतुक कोंडीची समस्या कायमची संपून नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात काटे यांनी म्हटले आहे की, स्मार्ट सिटी पिंपळे सौदागरचा काही अंशी भाग हा संरक्षण हद्दीत समाविष्ट आहे. संरक्षण हद्दीपासून काही अंतरावर वसलेल्या काटे वस्ती आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या नागरिकरणामुळे रस्त्याची समस्या भेडसावत होती. पिंपळे सौदागर येथील स्वराज हॉटेलसमोरून गोविंद गार्डन, काटे वस्ती, ट्रॉईस सोसायटी यांना जोडणारा १८ मीटर रुंद रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यात नियोजित करण्यात आला होता. मात्र, या रस्त्याची नऊ मीटर रुंद व ६०० मीटर लांब जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात होती. त्यामुळे हा रस्ता मागील अनेक वर्षे रखडला होता. त्यामुळे मी रस्त्यासाठी संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून जागेची मागणी केली. मात्र त्याला अपयश आले. प्रसंगी कोर्टाची पायरी चढावी लागली. त्या दरम्यान व्यवस्थेकडून मला अनेक कटू अनुभव आले. आज अखेरीस संरक्षण विभाग रस्त्यासाठी जागा देण्यास तयार झाला आहे.
नाशिक फाट्याकडून काटे वस्ती, कुणाल आयकॉन रस्त्याकडे जाणारी वाहने गोविंद गार्डन चौक व कोकणे चौकातून जातात. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास गोविंद गार्डन चौक व कोकणे चौकावर वाहतुकीचा ताण कमी पडणार आहे. तसेच हिंजवडी व वाकडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग सोईचा होणार आहे, असे संदीप काटे यांनी पत्रकात म्हटले आहे.
” महापालिका नगररचना व स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांची केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये संरक्षण खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याबाबतचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे पाठवला असून बऱ्याच दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर जागा महापालिकेकडे हस्तांतरित होईल. तद्नंतर रस्त्यासाठी निविदा निघतील आणि रस्ता आकारास येईल. तोपर्यंत मी पाठपुरावा करीत राहणार आहे. रस्त्यासाठी तत्कालीन चिंचवड विधानसभेचे दिवंगत स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मोठे सहकार्य केले होते. तसेच आता भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचेही त्या रस्त्यासाठी वेळोवेळी पाठबळ मिळत आहे.” – मा. संदीप काटे, सामाजिक कार्यकर्ते