उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इस्लामपुरात लक्ष घातले ; जयंत पाटील यांनी पवारांचा बालेकिल्लाच फोडला !
– अजित पवार समर्थक नगरसेवक जयंत पाटील यांच्या गळाला ; पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी दिली नियुक्ती
– अजित पवार यांच्या खेळीला जयंत पाटील यांचे जशास तसे उत्तर
महाईन्यूज : प्रदीप लोखंडे
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेठ नाका (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सभा घेतली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (खा. शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधकांना ताकद देणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले होते. उपमुख्यमंत्री पवारांनी दिलेल्या आव्हानाला जशास तसे उत्तर देण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात पवार समर्थक असलेले नगरसेवक तुषार कामठे यांनाच जयंत पाटील यांनी गळाला लावले आहे. कामठे यांना पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची (खा. शरद पवार गट) जबाबदारी दिली आहे. कामठे यांना काल शनिवारी (दि. १६) नियुक्ती पत्र देखील दिले आहे. तसेच शहरात लवकरच राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय सुरु करून त्याचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने उदघाटन देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन करेक्ट कार्यक्रम करण्याला जयंत पाटील यांनी सुरुवात केल्याचे हे सुतोवाच असल्याचे बोलले जात आहे.
2 जुलै रोजी अजित पवार हे समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण पक्ष संघटना त्यांच्यासोबत गेली आहे. मात्र नव्याने कार्यकर्ते, पदाधिकारी तयार करायला जयंत पाटील यांनी सुरुवात देखील केली आहे. अजित पवार यांच्या विरोधात एक शब्द ही न काढणाऱ्या बालेकिल्यालाच जयंत पाटील यांनी सुरुंग लावला आहे. खासदार शरद पवार यांच्या विचारांचे पदाधिकारी तयार करण्याकडे जयंत पाटील यांनी लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर अध्यक्ष पदी अजित पवार समर्थक नगरसेवकच फोडण्याचे काम पाटील यांनी केले आहे. शहराध्यक्ष पदासाठी पाच माजी नगरसेवकांनी मुलाखती होत्या. त्यामध्ये तुषार कामठे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली. या बरोबरच जयंत पाटील यांनी शहरात येणाऱ्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघात निरीक्षक नेमून त्यांना ताकद दिली आहे. ते पक्ष संघटन वाढवत आहेत.
या बरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता शरद पवार गटाने पक्ष कार्यालय थाटले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रागा पॅलेस जवळ काळेवाडी येथे पक्ष कार्यालय उभारले असून शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय पिंपरीतील खराळवाडीत आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीत असताना खराळवाडीत मध्यवर्ती कार्यालय सुरु केले होते. सध्याचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, अनेक माजी नगरसेवकांनी अजितदादांना साथ दिली आहे. त्यामुळे खराळवाडीतील कार्यालय अजित पवार गटाकडे राहिले आहे. शरद पवार गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष कार्यालय नव्हते. आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत कार्यालय उभारण्यात आले आहे. कार्यालयात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समधून अजित पवारांचा फोटो वगळण्यात आला आहे. शरद पवार आणि जयंत पाटलांचा फोटो लावण्यात आला आहे. कार्यालय उभारुन शरद पवार गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच कार्यालयातून आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढचे कार्य चालणार आहे.
———————————————————–
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज.
– मो नं – ७३५०२६६९६७