भोसरीतील रेडीरेकनरच्या दरावरून भाजपा आमदाराची बोलती बंद !

  • तोतया सामाजिक कार्यकर्त्याच्या आडून साधला राष्ट्रवादीवर निशाणा
  • भाजपाच्या पेड टीमचे षडयंत्र आले आमदार महेश लांडगे यांच्या अंगलट    

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या उपनगरांतील रेडीरेकनरचे दर नुकतेच जाहीर झाले. ही संधी साधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरीच्या विकासाचे दर पडण्याला आमदार महेश लांडगे हेच जबाबदार असल्याचा आरोप केला. गव्हाणे यांच्या आरोपात तथ्य असल्याने त्यांच्या आरोपाने आमदार लांडगे यांची बोलतीच बंद झाली. भोसरीतील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी गव्हाणे व राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. आमदार लांडगे यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांच्या ‘पेड टिम’ने चक्क सामाजिक कार्यकर्त्याचा चेहरा पुढे आणला आहे. परंतु, समाजाशी एकनिष्ठ असलेला हा सामाजिक कार्यकर्ता भाजपाशी मॅनेज कसा झाला, असा सवाल राजकीय जाणकारांनी उपस्थित केला आहे.

रेडीरेकनरचे दर पडल्याने भोसरी विधानसभेतील मोशी, तळवडे, चिखलीचे दर खूपच खाली पडले आहेत. 3900 ते 6000 रुपये प्रति सौरस फुट असा दर जाहीर झाला आहे. यावरून गव्हाणे यांनी आमदार लांडगे यांच्यावर टिका करण्याची संधी सोडली नाही. त्यांच्या टिकेत अतिशय तथ्य आहे, कारण जर भोसरीच्या विकासाकडे आमदार लांडगे यांनी गांभिर्याने पाहिले असते, तर भोसरीचा रेडीरेकनर दर पिंपळे सौदागर व वाकडपेक्षाही अधीक पटीने वाढला असता. हे दर ढासळण्याला आमदारच जबाबदार आहेत. कारण, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील निवडणुकीत निवडून आलेल्या भोसरीतील भाजपाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन आमदार लांडगे यांनी शिवनेरी किल्ला गाठला होता. राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर मस्तक ठेवून भोसरीच्या विकासाचे ‘व्हिजन 2020’ (Vision 2020) आमलात आणण्याची सामुदायीक शपथ घेतली होती. तत्पुर्वी, तत्कालीन मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसरी व्हिजन 2020चे लाखो भोसरीकरांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. हे नागरिकांना माहीतच आहे.

पुणे-नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा ते मोशीपर्यंत विस्तारीकरण करणे, दिघी व तळवडेला रेडझोनमुक्त करणे, इंद्रायणी नदीची किनारपट्टी विकसित करणे, चिखलीमध्ये डिअर पार्क विकसित करणे, मोशीतील कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविणे, अत्याधुनिक शाळा, अधुनिक साधनयुक्त रुग्णालये, सुसज्ज अंतर्गत रस्ते, अतिक्रमणमुक्त भोसरी अशे असंख्य प्रकल्प ‘व्हिजन 2020’ मधून सत्यात उतरणार होते. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाहीच पण हे प्रकल्प साकारल्यानंतर भोसरीचे नाव राज्यातच नव्हे तर देशात प्रथम क्रमांकावर घेतले जाईल, अशी भविष्यवाणी फडणवीसांनी त्यावेळी केली होती.

परंतु, आता 2021 उलटले तरी आमदार लांडगे यांच्या ‘व्हिजन 2020’ मधील एकही प्रकल्प महापालिकेतील भाजपाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रत्यक्षात उतरवता आला नाही. त्यामुळे भोसरीचा रेडीरेकनरचा दर ढासळण्यात आमदार लांडगे जबाबदार नसतील तर कोण असणार आहे. कारण, भोसरीकरांनी त्यांना एकवेळा नव्हे तर दोनवेळा विधानसभेचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. परंतु, त्यांनी भोसरीच्या विकासाकडे कमी अन् वित्तस्त्रोत वाढविण्यात अधिक लक्ष घातले. त्यामुळे भोसरीतील भाजपाच्या 32 नगरसेवकांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आम्ही अमुक काम केले तमुक केले असे जे सांगतात ती कामे महापालिकेच्या माध्यमातून झालेली आहेत. नगरसेवकांनी केलेली कामे आमदारांनी केल्याचे ठणकावून सांगण्यासाठी पेड टिमची मदत घेतली जाते. मात्र, त्यांच्या पेड टिमच्या करामती आमदारांच्याच अंगलट येत आहेत.

त्रयस्थ व्यक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपची चाल

अजित गव्हाणे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देऊ शकत नसल्यामुळे त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रंजीत गव्हाणे यांना पुढे केले आहे. रंजीत गव्हाणे यांचे सामाजिक कार्य यानिमित्ताने समाजापुढे आले आहे. सामाजिक कार्यकर्ता हा समाजाचा आरसा असतो. समाजाच्या उध्दारासाठी / विकासासाठी चुकीच्या मार्गाचा पायंडा पाडणारी व्यवस्था उधळून लावण्याची ताकद त्याच्यात असते. बायोमायनिंग, वेस्ट-टू-एनर्जी, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प, एसटीपी, च-होलीतील 420 कोटींचे रस्ते आदी कामांत झालेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याची हिम्मत त्याच्या अंगी असते. 2017 ते 2020 या भाजपाच्या कार्यकाळात करदात्या भोसरीकरांची झालेली लूट थांबवून सत्तापीपासू लोकांना सळो-की-पळो करण्याची उर्मी त्याच्या सामाजिक चळवळीत असते. याचा लवलेशही नसलेल्या रंजीत गव्हाणे यांच्या सामाजिक कार्याचा दाखला देणारी बातमी भाजपाच्या bjpforpcmc@gmail.com या मेलवरून प्रसिध्दीमाध्यमांच्या टेबलापर्यंत पोहोचत असेल तर हा सामाजिक कार्यकर्ता भाजपाच्या सुपा-या कधीपासून वाजवायला लागला, असा प्रश्न पडतो. त्यामुळे अशा तोतया सामाजिक कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय व्यक्ती आपली पोळी भाजून घेतात, अशा प्रतीक्रिया समाजात उमटत आहेत.

पाच वर्ष मौन धारण केलेले गव्हाणे लागले बोलायला

अजित गव्हाणे हे जुने आणि जानते नगरसेवक म्हणून ओळखले जातात. 2017 ते 2020 भाजपाच्या सत्ताकाळात ते पालिकेत सक्रिय नगरसेवक होते. भाजपाच्या सत्तेची पाच वर्षे सरली पण गव्हाणे यांना त्यांच्या भ्रष्टाचाराचा एकही मुद्दा उचलून धरता आला नाही. राष्ट्रवादीचे एक मातब्बर नगरसेवक म्हणून पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी झिडकारून त्यांनी तब्बल पाच वर्षे मौन धारण केले. भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या एकाही मुद्द्यावर त्यांनी सभागृहात तोंड उघडले नाही. शहराध्यक्ष पद मिळावे म्हणून कधी चळवळ उभी केली नाही. पक्षांतर्गत उपदृव मुल्य देखील जागृत ठेवले नाही. त्यामुळे गव्हाणे यांना शहराध्यक्ष पद मिळणे म्हणजे आप्तेष्ठांची पुण्याईच म्हणावी लागेल. पद असल्यामुळे त्यांना आता बोलावेच लागते. त्यामुळे त्यांनी आता भाजपा आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर निशाना साधायला सुरूवात केली आहे. सत्तेच्या पाच वर्षात गप्प बसायचे आणि निवडणुकीसाठी आरोप प्रत्यारोप करायचे ही खेळी न समजण्याइतपत भोसरीकर दुधखुळे नाहीत.   

Share to