महावितरणच्या नावाने तळवडेत महामृत्युंज मंत्र आणि अनुष्ठान पुजा संपन्न
कार्यकारी अभियंत्यांची अचानक आंदोलनस्थळी भेट; आंदोलन मागे घेण्याची विनंती…
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- भ्रष्टाचार उघडकीस येऊनदेखील महावितरण दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. आर्थिक लागेबांधे जोपासत आहे. नागरिकांच्या मुळावर उठलेल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा घणाघात शहर शिवसेनचे जेष्ठ नेते रामभाऊ उबाळे यांनी महावितरण व्यवस्थेवर केला. तसेच माणसे मेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? अशा शेलक्या शब्दात महावितरणाच्या कारभारावर टीकाही केली.
भ्रष्ट्राचारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच रोहित्रावर (यमरूपी ‘डीपी’) दिलेल्या अनावश्यक लोडपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, याकरिता तळवडे त्रिवेणीनगर येथील ‘ओव्हरलोड अशोक पवार डीपी क्रमांक ४६७६१०६ २०० KVA’ येथे आज शुक्रवारी (दि. ३१) रोजी आयोजक तळवडे रहिवासी नागरिक आणि शिवसेना तळवडे शाखेचे विभागप्रमुख नितीन बोंडे यांच्या वतीने ‘महामृत्युंज मंत्र आणि अनुष्ठान पुजे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान परीसरातील सर्व नागरिकांनी एकत्रित येत यावेळी घोषणा देऊन महावितरणाच्या अजब कारभाराचा निषेध नोंदविला.
यावेळी शहर शिवसेनचे जेष्ठ नेते रामभाऊ उबाळे, पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश बक्षी, महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर, भालचंद्र सावंत, शिवसेना भोसरी विधानसभेचे विभागप्रमुख नितीन बोंडे, सचिन सानप, अरुण थोपटे, जमीर मुल्ला, राहुल पवार, वसंत पतंगे, अप्पा नरळे, सर्जेराव कचरे, लक्ष्मण गुरसाळी, सुभाष टीकाटे, दगडू सातपुते, अशोक पवार, रमेश पाटोळे, प्रवीण राजपूत, अनंत पाठक, उत्तम नेवासे, नारायण मुकदम, अरुण सूर्यवंशी, प्रवीण पाटील, नंदाराम नांगरे, प्रदीप बेळगावकर, सुजाता काटे, हितेश नेमाडे, अमित शिंदे, सुनील संगीत, अंकुश बंडगर, गणेश भिंगारे, संदीप चव्हाण, गणेश इंगवले, राजेंद्रसिंह राठोड, गणेश गाडे, विजय अर्जुन, रमेश परीट, दीपक कदम, मनोज हरपळे, जावेद मुजावर, नटराज बोबडे, सुरज बराटे, मनोज सजदेव, दिलीप कदम, महेश माने, प्रदीप पाटील, अरुण डाके, उमेश परदेशी, बिराजदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अध्यक्ष गिरीश बक्षी म्हणाले, महावितरण कंपनीच्या प्राधिकरण सब डिव्हिजन मधील अति. कार्यकरी अभियंता आणि दोन सहायक अभियंत्यांनी संगनमत करून रूपी नगर येथील दोनशे केव्ही क्षमतेच्या रोहित्रावर आधीच पाचशे केव्ही क्षमतेचा लोड टाकला. असे असताना एका इमारतीसाठी याचा लोड फक्त ६५ केव्ही क्षमतेचा असल्याचे भासवत त्याच्यवर आणखी १०० केव्ही क्षमतेचा वीजभार टाकला. यातून मोठा आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस आला. तळवडे शाखा कार्यालयाचे तत्कालीन सहायक अभियंते रमाकांत गर्जे यांनी आणखी एका इमारतीमध्ये पाच लाखांचा महसूल बुडविला आहे. तो भ्रष्टाचार शिवसेना रुपीनगरचे विभागप्रमुख नितीन बोंडे आणि आमची पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल कोन्त्राक्त्र संघटना हिने उघडकीस आणला आहे. या अति धोकादायक रोहीत्रामुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका आहे. हा रहदारीचा रस्ता आहे. शेजारीच शाळा आहे. नागरिक ये-जा करीत असतात. रोहीत्राचा स्फोट झाल्यास त्यांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. महावितरण याकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे शेवटी देवाकडे धावा केला. महावितरणाच्या नावाने महामृत्युंजय मंत्र आणि सत्यनारायण पूजा घातली. अशाने देव प्रसन्न होऊन या यमरुपी रोहित्रापासून आमची रक्षा करेल.
संतोष सौंदणकर म्हणाले, महावितरणने भ्रष्ट रमाकांत गर्जे या दोषी अधिकाऱ्यावर तब्बल पंधरा दिवसाने निलंबनाची कारवाई केली. अद्याप त्याच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यानंतरदेखील या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी महावितरणचे अधिकारी एकत्र आले. त्यांनी भोसरी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या ऑफिसमध्ये येऊन ठिय्या मांडला. पाच लाखाचे नुकसान करून देखील या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी सर्व अधिकारी एकत्र आले. म्हणजे काय तर ‘उंदरानेच जहाज कुरतडून खायचा हा प्रकार सुरु आहे’. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा. या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावावी. निलंबित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही कोर्टात जावू.
नितीन बोंडे म्हणाले, रुपीनगरमध्ये एकता चौकातील वीज रोहित्र महावितरणने मागे काढून नेले आहे. तो पुन्हा पुनर्स्थापित करावा. त्यामुळे लोडचा त्रास कमी होईल. त्याची सर्व प्रक्रिया देखील तयार आहे. यासाठी महावितरणने पुढाकार घ्यावा.
आंदोलनस्थळी दाखल झालेले भोसरी महावितरणचे कार्यकारी अभियंता देवकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना आंदोलन थांबवा, अशी विनंती केली. तसेच मुख्य अभियंता यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे शाखा अभियंता यांना निलंबित केले आहे. चौकशी सुरु आहे. चौकशी झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. चुक नसणाऱ्या कर्मचाऱ्याला कारवाईत गोवता येऊ नये, यासाठी सर्व बाजूनी तपास सुरु आहे. सर्व अधिकाऱ्यांना नियमात राहूनच काम करावे लागेल. नियमबाह्य कामे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. रोहीत्रावरील लोड आठ दिवसात नियमित करू, असे आश्वासन यावेळी दिले.”