वाळव्याचा वाघ राज्यात गुरगुरला, राष्ट्रवादीला तारले अन विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला !

सांगली : प्रतिनिधी

जयंत पाटील म्हणजे दुसरे शरद पवार. त्यांची तशी छबी महाराष्ट्राने निर्माण केली आहे. शांत, संयमी बोलणे. मनाचा थांगपत्ता लागू न देणे आणि जास्त बडबड न करता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करने ही जयंतरावांची ख्याती. त्याचा प्रत्यय नुकताच आला. 

राज्यात लोकसभेचा निकाल हाती आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तब्बल आठ खासदार निवडून आले. या यशात सिंहाचा वाटा प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांचा आहे. त्यांनी राज्यभर दौरे करत पायाला भिंगरी लावली होती. उमेदवारांची जुळवाजुळव केली. योग्य उमेदवार निवडले. त्यांना आत्मविश्वास दिला आणि विजयाकडे घेऊन गेले. राष्ट्रवादी फुटीनंतर सोबत न येणाऱ्या जयंत पाटील यांना अपात्र करण्याच्या भाषा अजित दादा आणि त्यांचे सहकारी करत होते. पण वाळव्याचा हा वाघ राज्यभर गुरगुरला आणि विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित दादांच्या नेतृत्वात अनेक जण खासदार शरद पवार यांना सोडून गेले. पक्षावर आणि चिन्हावर दावा केला. सत्तेत गेले. आपल्यासोबत जयंत पाटील देखील हवेत असे अनेकांना वाटत होते. प्रत्येकाने जयंत पाटील यांना विविध पदांच्या ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र संकटात शरद पवारांना साथ देऊन राजकीय प्रतिमा उंचावण्याचे काम जयंत पाटील यांनी केले. 

भविष्यातील मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी हा डाव खेळल्याचे अनेक जण सांगत आहेत. ही एक बाजू असेलही. मात्र भविष्यातील चित्र धूसर असताना, विरोधकांनी शासकीय यंत्रणा मागे लावलेल्या असताना सद्या तरी संघर्ष करण्याचा धाडसी मार्ग त्यांनी निवडला. एवढेच नाही. तर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी अडचणीत असताना संघटन मजबूत करण्याचे काम शरद पवार यांच्या नंतर जयंत पाटील यांनीच केले. उमेदवारांची निवड करून, नाराजांना आपल्या पक्षात आणून तिकीट द्यायचे. त्यांना विजयी करायचे याकडे जयंत पाटील यांनी बारकाईने लक्ष दिले. माढा लोकसभा मतदारसंघात अजित दादांच्या वर नाराज होऊन भाजपावासी झालेल्या मोहिते पाटील यांना जयंतरावांनी मध्यस्थी करून पक्षात आणले. बीड मध्ये बजरंग सोनवणे यांना पक्षात आणून बलाढ्य आव्हान दिले. तशीच मध्यस्थी अहमदनगर मध्ये केली. निलेश लंके यांना सोबत घेतले. एवढेच नाही तर पक्षाची प्रतिमा ढासळत असताना..पक्षाकडे इतर एकही बलाढ्य नेता नसताना पक्षाची बाजू ठामपणे मांडणारा नेता जयंत पाटील होते.

आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे चित्र आहे. त्याच्यात वाळव्याच्या या वाघाचा मोठा वाटा आहे. एकूणच त्यांच्या समर्थकांच्या भाषेत सांगायचे झाल्यास वाळव्याच्या वाघाने राष्ट्रवादीला राज्यात तारले आणि विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला !

Share to