सत्यजित आबा म्हणतात…अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !
सांगली : प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांनी दिलेली लढत कौतुकास्पद आहे. ना पैसा, ना लोकसभा निवडणुकीचा अनुभव. पण केवळ उद्धव साहेबांचा आदेश शिरस्थ मानून ठाकरेंचा हा वाघ मैदानात उतरला. लढला आणि केवळ १३ हजार मतांनी पराभुत झाला. तरीही पराभवाने खचून न जाता मी हातकणंगलेच्या लोकसवेत सक्रिय राहीन, अशी डरकाळी सत्यजित आबांनी फोडली आहे. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली असे म्हणतच जणू त्यांनी आपल्या समर्थकांना भावनिक साद सोशल मीडियातून घातली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच रंगत वाढली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन करत मला मदत करण्याची विनंती केली. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना काही अटी घालण्यात आल्या. त्या मान्य न झाल्याने शेट्टी यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण याची चाचपणी झाली. या वेळी सत्यजित आबा पाटील यांचे नाव समोर आले.
बीएस्सी ऍग्री ही उच्चशिक्षित पदवी. स्वभावाला नम्र. सर्वांशी हसतमुख आणि सहज संवाद साधणारे नेतृत्व अशी सत्यजित आबांची ओळख. शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या याच चाहत्यांच्या जोरावर त्यांनी कारखानदार, माजी मंत्री राहिलेल्या बलाढ्य नेतृत्व आमदार विनय कोरे यांचा २०१४ मध्ये पराभव केला होता. गेल्या पाच वर्षात राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडली. या वेळी सगळी सत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना सत्यजित आबा पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्याचाच परिणाम म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर ठाकरेंचा हा वाघ मैदानात उतरला.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पन्हाळा शाहूवाडी, वाळवा, शिराळा, शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी या सहा विधानसभेचा समावेश होतो. १७ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. एवढा मतदारसंघ. त्यामध्ये पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सत्यजित आबांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना कडवी झुंज दिली. पाच लाख सहा हजार ७६४ मते घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येईल हे सांगणे अवघड झाले होते. अखेरचा निकाल हाती आला तेव्हा सत्यजीत आबा १३ हजार ४२६ मतांनी पराभूत झाले.
सत्यजित पाटील यांच्याकडे कोणतीही मोठी संस्था नसताना धनशक्तीच्या विरोधात दिलेली लढत आठवणीत राहणारी आहे. त्यांच्यासारखा चांगला माणूस खासदार हवा होता हीच भावना सर्वसामान्य माणूस व्यक्त करत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव. आता लोकसभेत पराभव होऊनही सत्यजित आबा लोकसेवेत सक्रिय राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ते म्हणतात…पराभवाने मी खचून जाणार नाही.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोकसेवेत मी सक्रिय राहीन. त्यांची ही साद कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी आहे. उषःकाल होता होता. काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अशी सादच जणू सत्यजीत आबांनी घातली.