शेतकऱ्यांनी आसुड ओढला पण स्वाभिमानीच्या पाठीवर…
सांगली : संपादकीय
राज्यकर्त्यांना सरळ करण्याची हिंमत देशातील बळीराजाकडे आहे. शेतकरी हितासाठी राबणाऱ्या नेतृत्वाला बैलगाडीत बसवून संसदेत पाठवणारा बळीराजा आहे. तर चुकीची भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीवर आसूड देखील ओढण्याची ताकद बळीराजा मध्ये आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा शेतकऱ्यांनी आसुड ओढला खरा. मात्र तो स्वाभिमानी संघटनेच्या पाठीवर.
माजी खासदार राजू शेट्टी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. शेतकऱ्यांनी म्हणावी तशी साथ दिली नसल्याचे म्हणत शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली खरी. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शेट्टी यांचे दलबदलू राजकारण हेच पराभव होण्याचे कारण नाही का ? याचे आत्मचिंतन शेट्टी यांनीच करने गरजेचे आहे.
कारखानदारांनी वेढलेला भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. भरघोस नफा होऊनही शेतकऱ्यांच्या उसाला नाममात्र दर दिले जायचे. मात्र कारखानदारांना नेमका नफा किती होतो. शेतकऱ्यांच्या उसाला कारखानदार किती रुपये दर देऊ शकतात, याचे गणित मांडण्याची किमया माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांना ते पटवून दिले. दरासाठी लढायला पाहिजे हा आत्मविश्वास दिला. शेतकरी एकजूट केले आणि लढा द्यायला सुरुवात केली. शरद जोशी यांच्या नंतर शेतकऱ्यांची आक्रमक संघटना राजू शेट्टी यांनी निर्माण केली.
शेट्टी यांची आंदोलने म्हणजे देशभर चर्चेचा विषय. कारखानदारांना देखील शेट्टी यांनी घाम फोडला होता. शेतकऱ्यांची बाजू घेणारा हा पुत्र २००९ आणि २०१४ मध्ये भरघोस मते घेऊन शेतकऱ्यांनी संसदेत पाठविला. मात्र नंतरच्या काळात सत्तेची हवा लागली आणि हा शेतकरी पुत्र राजकीय भूमिका चुकीची घेऊ लागला, अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कारखाने आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात संघर्ष करताना भाजपाची ताकद शेट्टी यांनी आपल्या बाजूने घेतली. मोदी सरकारला पाठिंबा दिला होता. नंतरच्या काळात केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणाविरुद्ध शेतकरी नाराज होत असल्याचे दिसताच. शेट्टी यांनी भाजपाची साथ सोडली. भाजपासोबत सत्तेत गेल्याचा पश्चाताप झाल्याचे सांगितले. नंतरच्या काळात राज्यात पुन्हा राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतली. त्यांची ही भूमिका त्यांची राजकीय इमेज डाऊन करणारी ठरली. त्यांचा हक्काचा मतदार मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतात राबणारा मजूर वर्ग होता. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांशी त्यांनी हितसंबंध जोपासले नसते तरी ते भरघोस मतांनी विजयी झाले असते. याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजू मांडताना शेतात राबणाऱ्या मजुरांच्या प्रश्नांवर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे मजूर वर्ग देखील नाराज होता. देशात आणि राज्यात जातीय धार्मिक द्वेष वाढत असताना त्यावर योग्य मत मांडण्याची राजकीय भूमिका शेट्टी यांना घेता आली नाही. त्याचा परिपाक म्हणून 2019 आणि 2024 मध्ये त्यांचा पराभव झाला.
देशातील बळीराजा कष्टाची भाकर खाऊन देशाप्रती आपली भूमिका प्रामाणिकपणे मांडत असतो. मात्र शेतकरी हिताच्या विरोधात कोणी गेले तर आसूड ओढत जमिनीवर आणण्याची किमया देखील बळीराजाकडे आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही बळीराजाने आपल्या पाठीवर आसूड का ओढला याचे चिंतन शेट्टी यांनी करणे आता गरजेचे आहे.