चिखली मोरेवस्तीतील ‘संघर्ष महिला मंडळ’ महिलांसाठी प्रेरणादायी – रुपाली साने
- गेल्या सात वर्षापासून करतात गणरायांची प्रतिष्ठापना
- मंडळाच्या सामाजिक उपक्रमांना पाठबळ देण्याचे साने यांचे आश्वासन
पिंपरी / महाईन्यूज
गणेशोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे यात आता महिला देखील मागे नाहीत. चिखलीतील मोरेवस्तीमधील गोकुळ हौ. सोसायटी येथे महिलांनी पुढाकार घेत ‘संघर्ष महिला मंडळ’ या गणेश मंडळाची स्थापना केली आहे.
गेल्या सात वर्षापासून ते गणरायाची नियमित स्थापना करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपाली साने यांनी दाद दिली असून, मंडळाच्या मानाच्या या गणेशाची त्यांच्या हस्ते आरतीदेखील करण्यात आली. गणेश मंडळ स्थापनेची पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली असून यात महिलादेखील पुढे येत असल्याचा संदेश समाजात जात असल्याचे मत रुपाली साने यांनी यावेळी व्यक्त केले.
रुपाली यावेळी म्हणाल्या, गणेशोत्सवा दरम्यानच्या अकरा दिवसात महिलांसाठी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. तसेच रांगोळी स्पर्धेतून पाणी बचतीचा, वृक्षारोपणाचा संदेश, महालक्ष्मी सजावटीमधून सामाजिक संदेश, महिला हक्क व कायदे याबाबत जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव, बचत गटांना मार्गदर्शन, असे एकंदरीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम या महिला गणेश मंडळाच्या वतीने राबविले जात आहेत. महिलांचा हा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमाला नेहमीच माझा पाठींबा राहील. गणेश मंडळातील सदस्यांना योग्यवेळी दिशादर्शन आणि पाठबळ देण्याचे वचन रुपाली साने यांनी यावेळी मंडळाच्या महिला सदस्यांना दिले.