४ ऑक्टोबरला शाळेची घंटा वाजणार, मेस्टाचे जिल्हाध्यक्ष संदीप काटे यांच्या मागणीला यश
- आठ लाख शिक्षकांच्या रोजगाराचा प्रश्नही मिटणार
पिंपरी :- कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला आहे. कोरोना पॉझीटिव्हीटी रेटही समाधानकारकपणे घटत आहे. टास्क फोर्सदेखील शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक असताना राज्य सरकारकडून शाळा सुरु करण्याबाबत कोणताच निर्णय होत नव्हता.
याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तथा स्टेट इंग्लिश स्कूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप काटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शाळा सुरु करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यास यश आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
याबाबत माहिती देताना संदीप काटे म्हणाले, कोरोना संक्रमणाचा धोका अटोक्यात आल्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान आदी राज्यात शाळा सुरु झाल्या आहेत. घरात राहून टिव्ही आणि मोबाईल एवढेच विश्व राहिल्याने विद्यार्थ्यांची बौध्दीक वाढ खुंटत आहे. शाळा सुरू केल्या तर विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून शाळेत शिकता येईल. चालू आर्थिक वर्षात सर्वच शाळा व्यवस्थापकांनी शाळा सुरू करण्याची तयारीदेखील केली आहे. राज्य शासनाच्या नियमांचे पालन करत शाळांच्या वर्ग खोल्या सॅनिटाईज करून घेतल्या. सर्व शिक्षक आणि इतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण झाले. तरी देखील राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेत नव्हते. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
संस्था चालकांच्या अडचणी समजून मेस्टाने संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आग्रही भूमिका घेत, सरकारला शाळा सुरू करण्याबाबत अल्टीमेटम दिला होता. ‘शाळा सुरू करा नाहीतर २७ तारखेपासून आम्हीच शाळा सुरु करु’ असा इशाराही दिला होता. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सह्याद्रीवर तातडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शाळांचे प्रश्न मिटतीलच परंतु; राज्यातील ६ लाख ५०,००० शिक्षक व १ लाख ५०,००० शिक्षकेतर कर्मचारी यांना रोजगार मिळून त्यांचे आर्थिक प्रश्न मार्गी लागणार आहेत. आता या आदेशाची अंमलबजावणी देखील तेवढ्याच तत्परतेने राज्य सरकारने करावी, अशी मागणीदेखील संदीप काटे यांनी केली आहे.