होय, मी रस्ता बोलतोय..! रस्ता व नगरसेवक नवीन हवा.

पिंपरी |प्रतिनिधी|

आता नागरिकांची एकच मागणी, रस्ता व नगरसेवक नवीन हवा. होय, मी रस्ता बोलतोय.. अशा आशयाचे फ्लेक्स वाकड परिसरातील रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. विद्यमान नगरसेवकांवरील रोष व्यक्त करण्यासाठी लढविण्यात आलेली अनोखी शक्कल आणि फ्लेक्सबाजीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून हे फ्लेक्स सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात होत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीचे बिगुल वाजू लागले आहेत. अनेकांनी कंबर कसली असून प्रभाग रचना निश्चित होताच जोरडार तयारी सुरु केली आहे. वातावरण तापत असताना वाकड परिसरात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या या फ्लेक्सची भर पडली असून या फ्लेक्सचे फोटो तरुण टिपताना दिसत आहेत.

वाकड परिसरात काही ठिकाणी रस्ते विकसित करतांना काहीजणांकडून भुसंपादनाला आडकाठी होत असल्याची देखील चर्चा यापूर्वी रंगली होती. रस्ते अडवणुकीला नगरसेवकांनाच जबाबदार धरून हा फेल्क्स लावला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे फ्लेक्स कोणी व का लावले?, कोणाला उद्देशून लावले याबाबात माहिती मिळु शकली नाही. मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनेकांनी दंड थोपटले असून वाकड परिसरात जोरदार राजकीय आखाडा पहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.

Share to