‘घरकूल’मध्ये ८३ भाडेकरू; तर ७२१ सदनिकांना कुलूप!
पिंपरी |प्रतिनिधी|
आर्थिक दुर्बल घटकांसाठी महापालिकेने चिखलीत घरकूल प्रकल्प उभारला आहे. त्यातील सदनिकांची चार सप्टेंबर रोजी महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यात एक हजार २४२ सदनिका बंद आढळल्या होत्या. त्यांचे शनिवारी पुन्हा सर्वेक्षण केले. त्यामध्ये ७२१ सदनिका बंद, ८३ सदनिकांमध्ये भाडेकरू व ४३८ सदनिकांमध्ये स्वतः लाभार्थी राहत असल्याचे आढळून आले, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्यासह वीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने पुन्हा तपासणी केली. त्याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कळविले आहे की, ‘घरकूल प्रकल्पातील लाभार्थ्यांना १० वर्षांपर्यंत सदनिका भाड्याने देता येत नाहीत. तसेच विक्रीही करता येत नाही. लाभधारकांच्या समवेत झालेल्या करारनाम्यात या सदनिकांचा वापर स्वतः राहण्यासाठी करायचा असल्याचे नमूद केले आहे. या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांचा लाभ रद्द करण्याची तरतूद आहे. त्याबाबत संबंधितांना नोटीस देण्यात येणार आहेत. त्याची कार्यवाही करण्याचा आदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांना दिला आहे.’