पुण्यात Covovax ची ट्रायल सुरु, 7-11 वयोगटातील मुलं होणार सहभागी

पुणे – पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोव्होव्हॅक्स (Covovax) लसीच्या 2/3 टप्प्याची ट्रायल सुरू झाली आहे. सध्या ही ट्रायल 7 ते 11 वर्षे वयाच्या मुलांवर केली जात आहे. दिल्लीतही, जामिया हमदर्द इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चमध्ये कोव्होव्हॅक्सच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी स्वयंसेवकांची भरती सुरू झाली आहे.

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ संजय लालवानी यांनी सांगितलं, पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाने बुधवारी 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोव्होव्हॅक्सची 2/3 टप्प्यातील ट्रायल सुरू केली आहे. चाचणीसाठी 9 मुलांची भरती करण्यात आली आहे. लसीच्या या टप्प्याच्या ट्रायलसाठी, देशात 9 केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचाही या केंद्रांमध्ये समावेश आहे.

डॉक्टर लालवानी म्हणाले की, जे मुलं चाचणीत सहभागी होऊ इच्छित होते अशा मुलांच्या पालकांशी आधी चर्चा करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना स्थानिक भाषेत सल्ला देण्यात आला आणि ऑडिओ व्हिज्युअल कंसल्टिंग प्रक्रिया रेकॉर्ड करण्यात आली. भारतात मुलांवर कोविड विरूद्ध लसीच्या ट्रायलची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यात सहभागी होण्याचं वय 2 ते 17 वर्षे आहे. पुण्यात सुरू झालेल्या ट्रायल दरम्यान, मुलांना 21 दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले जातील. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतात आणलेल्या नोवोव्हॅक्स लसीची भारतीय आवृत्ती कोव्होव्हॅक्स आहे.

 मुलांची ट्रायल घेण्यासाठी स्वयंसेवकांची भरती

रविवारी हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चमध्ये 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कोविड- 19 विरोधी लस कोव्होव्हॅक्सच्या तीन क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वयंसेवकांची भरती सुरू झाली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रायल 10 ठिकाणी घेतली जाईल आणि 920 मुलांचा सहभाग असेल. त्यात 12-17 आणि 2-11 वयोगटातील 460-460 मुलं असतील.

Share to