स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार बाहेर काढण्याची सोमय्यांनी हिम्मत दाखवावी – सचिन अहिर

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी–चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पालिका लुटली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा भाजपाच्या किरीट सोमय्यांनी महापालिका आणि स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यावे. त्यांनी येथील भ्रष्टाचार बाहेर काढून दोषींवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशा शब्दांत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी सोमय्यांना आव्हान दिले.

चिखली येथील साने चौकात शिवसेनेच्या नेताजी काशिद आणि साधना काशिद यांच्या वतीने अहिर यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी छोटेखानी सभेत ते बोलत होते. शिवसेना मोरेवस्ती शाखेच्या वतीने पिंपरी–चिंचवड महापालिकेत भ्रष्टचाराच्या विरोधात जमा केलेल्या दोन हजार सह्यांचे निवेदन आहिर यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, युवा सेना विस्तारक राजेश पळसकर, जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, गटनेते राहुल कलाटे, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, उपशहरप्रमुख नेताजी काशिद, साधना काशिद, रावसाहेब थोरात, सचिन सानप, युवराज कोकाटे, संजय गाढवे, सुमंत तांबे, हरिभाऊ लोकरे, अनंत मते, सूर्यकांत देशमुख, अशोक गायकवाड, विजय शिवपुजे, गणेश अवचिते, रमेश सांगडे, मोहन डोळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

संकटकाळात केंद्राने मदतीस नकार दिला

गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारी, लॉकडाऊन, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, पूर अशी अनेक संकटे महाराष्ट्रावर आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने या संकटांचा संयमाने मुकाबला केला. मात्र, केंद्र सरकारने या संकट काळात राज्याला कोणतीही मदत दिली नसल्याची टीका अहिर यांनी केली.

अहिर यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत 

नेताजी काशिद आणि साधना काशिद यांच्यावतीने तब्बल २५ फुटी भव्य पुष्पहाराने संपर्कप्रमुख अहिर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे वातावरण जल्लोषपूर्ण बनले होते, या जल्लोषपुर्ण वातावरणात स्वतः सचिन अहिर भारावून गेल्याचे पहायला मिळाले. या स्वागताने मोरेवस्तीत शिवसेनेची मजबूत बांधणी असल्याचे अहिर यांनी नमूद केले.

Share to