भोसरीत वीजेचा लपंडाव, रवी लांडगे यांनी उपसले आंदोलनाचे शस्त्र
- सत्ताधारी भाजप पदाधिका-यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
पिंपरी | महाईन्यूज
भोसरीमध्ये समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. महापालिकेच्या सत्तेतील मोठ-मोठी पदे घेऊन बसलेल्या लोकप्रतिनिधींना गेल्या साडेचार वर्षात नागरिकांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. हे भाजपाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून खंडीत वीजपुरवठा होत आहे. संपूर्ण भोसरी अंधारात असताना देखील या लोकप्रतिनिधींचे डोळे उघडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. याला कंटाळून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांनी महावितरणच्या विरोधात महा जन आंदोलन पुकारले आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथून गुरुवारी सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. तेथून बालाजीनगर, गवळी माथा येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
वारंवार खंडित होणा-या विद्युत पुरवठ्याला जबाबदार कोण, भोसरीत वारंवार विज जाते. आम्ही वेळेवर बिले भरतो आणि आमचा हरिपाठ, काकडा चालू असतानाही विज जाते. याला जबाबदार कोण ?. याचा जाब विचारण्यासाठी येत्या गुरुवारी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. आपणच आपल्या हक्कासाठी लढूयात, सर्वांनी गुरुवारी एमएसईबी विरोधात होणा-या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक लांडगे यांनी केली आहे.