‘पीएमपीएमएल’ बसची दुचाकीला धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
पिंपरी (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे ते चाकण रोडवर दुचाकी आणि पीएमपीएमएल बस समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.19) सायंकाळी सातच्या सुमारास खालुंब्रे गावच्या हद्दीत हा अपघात घडला. याप्रकरणी पीएमपीएमएल चालकावर गुन्हा दाखल झाला आहे..
सत्यवान कुंडलिक बेंद्रे (वय 30, रा. सुनिलनगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पीएमपीएमएल चालकाचे नाव आहे. शिवजीत अजयकुमार मंडल (वय 21, रा. वडगाव मावळ, ता. मावळ) आणि एक 25 अनोळखी इसम या अपघातात मृत्युमूखी पडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएलचा चालक बस क्र. (एमएच 14, एच क्यु 5983) घेऊन तळेगाव दाभाडे ते चाकण रोडवर भरधाव वेगाने निघाला होता. समोरून शिवजीत आपल्या दुचाकीवर (एमएच 04, इजी 8621) येत होते. बसची दुचाकीला जरोदार धडक बसल्याने यात दोन तरुणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण (म्हळुंगे) पोलीस अधिक तपास करीत आहेत.