भाजपाचे किरीट सोमय्यांनी स्मार्ट सिटीतील 500 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी
महापालिकेतील आंदोलनात शिवसैनिकांचे खुले आव्हान
पिंपरी | महाईन्यूज
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने केलेल्या 500 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. यात सहभागी असलेल्या पक्षाच्या पदाधिका-यांवर कारवाई करण्यासाठी हे प्रकरण ईडीच्या हाती द्यावे. जे पदाधिकारी यात दोषी आढळतील त्यांना तुरूंगात पाठवावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने आज महापालिकेतील महापौर यांच्या दालनासमोर भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
‘हिम्मत दाखवा… हिम्मत दाखवा… किरीट सोमय्या हिम्मत दाखवा…’, ‘भ्रष्टाचारी भाजपचा विजय असो…’ अशा घोषणा देण्यात आल्या. किरीट सोमय्या आपण घराघरात घुसलेला आहात. राज्यातील प्रत्येक नेत्याच्या चौकशा सुरू केल्या आहेत. त्याबरोबरच आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या फाईली दिल्या आहेत. त्याची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी केली. यावेळी सोमय्या यांच्या चेह-याचा मुखवटा लावून शिवसैनिकाने त्यांच्या आवाजात चौकशी करून दुध का दुध व पाणी का पाणी करणार असल्याचे उपरोधीतपणे सांगितले.
स्मार्ट सिटीच्या विकास कामांतील 10 हजार रुपयांचा वॉटर मीटर 60 हजार रुपयांना खरेदी केला. पॅकेज बीड असल्याचे सांगून सल्लागार फसवणूक करतात. फायर वॉल एक 66 लाखाला आणि दुसरा 6 कोटीला घेतला आहे. हा स्मार्ट सिटीतील घोटाळा नव्हे का ? किरीट सोमय्या हे उठसूठ महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करीत आहेत. सरकार डळमळीत करण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. त्यांना जनाची नाही पण मनाजी… असेल तर त्यांनी महापालिकेतील स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी उबाळे यांनी केली.
आंदोलनात शिवसेना शहराध्यक्ष एड. सचिन भोसले, माजी अध्यक्ष योगेश बाबर, माजी नगरसेवक अनंत को-हाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.