पेट्रोल बॉम्ब हल्ल्यातील तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू बांधकाम व्यावसायिक शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर ज्वलनशील पदार्थांनी भरलेल्या बाटल्या फेकणा-या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
राहुल राम साळुंके (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 308, 436, 511, 336, 34, ज्वालाग्राही पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 3, 4, 5, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे गुरव येथे त्यांचे चंद्ररंग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा. ली. कार्यालय आहे. एका दुचाकीवरून तिघेजण मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आले. त्यातील दोघांनी कार्यालयावर कार्यालय नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ भरलेल्या दोन बाटल्या फेकून मारल्या. मात्र, एक बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर पडला. तर दुसरा रस्त्यावर पडला आहे.
हा बॉम्ब कार्यालयावर पडला नाही. त्यामुळे यात कुणीही जखमी झाले नाही. शंकर जगताप आणि त्यांच्या कार्यालयात कर्मचारी होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन तातडीने सुत्रे हविली. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली होती.
तीन आरोपीं ताब्यात घेण्यात आले. त्यातील दोघांना पिंपरी-चिंचवड शहरातून तर एकाला शहराबाहेरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी केवळ नाव कमावण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले. अटक प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.