स्मशानभूमी व दफणभूमीसाठी 30 एकर जागा उपलब्ध करा

  • मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील ओटा स्किम सेक्टर 22 भागातील हिंदू, मुस्लिम, लिंगायत, ख्रिश्चन, व इतर समाजाच्या स्मशानभूमी व दफणभूमीची सध्याची जागा अपुरी पडत आहे. भविष्यात लोकसंख्या वाढीचा उच्चांक पाहता स्माशनभूमी व दफनभूमींचा विस्तार होण्यासाठी जागेची गरज आहे. यासाठी देहूरोड कँटोन्मेंट हद्दीतील ३० एकर जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे गटनेते तथा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.

यासंदर्भात आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ओटा स्कीम सेक्टर 22 येथील परिसरात विविध धर्माचे लाखो नागरिक राहतात. त्यांना महानगरपालिका दैनंदिन सुविधा पुरवत असली तरी हा परिसर देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या अधिकार कक्षेत येतो. शहराचा विकास झपाट्याने होत असल्यामुळे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. लोकसंख्या वाढीनुसार सुविधा देण्याचा आवाका वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले पाहिजे.

या भागातील नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी, दफनभूमीमधील सध्या उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे या भागातील सर्वच स्मशानभूमी व दफनभूमीवर भार पडत आहे. हिंदू, मुस्लिम, लिंगायत, ख्रिश्चन व इतर समाजाच्या स्मशानभूमी व दफणभूमीमध्ये सध्या जागा उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात अंत्यविधीसाठी या भागातील नागरिकांची मोठी तारांबळ होणार आहे. जागेअभावी शवाची होणारी अवहेलना आपणास असह्य होणारी आहे.

त्यामुळे ओटा स्कीम सेक्टर 22 मधील सर्व स्मशानभूमीचा विस्तार करण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंटची 30 एकर जागा उपलब्ध करून घ्यावी. करण, या स्मशानभूमीच्या पाठीमागील जागा ही कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत येते. तीस एकर जागा उपलब्ध करून घेतल्यास त्यातील 5 एकर जागा हिंदू स्मशानभुमीसाठी, 5 एकर जागा मुस्लिम दफणभूमीसाठी, 5 एकर जागा लिंगायत समाजाच्या दफणभूमीसाठी आणि 5 एकर जागा ख्रिश्चन समाजाच्या ग्रेव्ह यार्डसाठी देण्यात यावी. तरच, पुढील शंभर वर्षासाठीचा अंत्यसंस्काराचा प्रश्न सुटणार आहे.

कोरोना काळामध्ये जागेअभावी मृतदेह ताटकळत ठेवावे लागले. असंख्य शवांची अवहेलना झाली. करण, या महामारीचा कोणालाच अंदाज नव्हता. त्यावेळी शक्य तेवढ्या पद्धतीत प्रशासन व लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्व प्रकारे मनापासून प्रयत्न केले. तरी, कोरोनाचे संकट अद्याप नाहिशे झालेले नाही. करोनाची भीती प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आजदेखील कायम आहे. भविष्यात आपल्यावर अशी वेळ येऊ नये, यासाठी आपण देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून 30 एकर जागा उपलब्ध करून घ्यावी, असे चिखले यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Share to