नागरिकांनो काळजी घ्या, अन्यथा निर्बंध कठोर करावे लागतील – महापौर माई ढोरे
पिंपरी (प्रतिनिधी) – ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क, सँनिटायजर, सामाजिक व सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर महापालिका प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर निर्बंध लावण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिला.
शहरातील नागरिकांनी राज्यशासनाने व महापालिका प्रशासनाने कोरोना संदर्भात केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पुर्ण न केलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावे. नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे.
लग्न, अंत्यविधी अश्या वेळप्रसंगी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार उपस्थित लोकसंख्येच्या मर्यादांचे पालन करावे. महापालिका प्रशासन कोरोना संदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन जम्बो कोविड सेंटर सारख्या उपाययोजना करत आहे. महापालिका प्रशासनाकडुन शहरातील कोरोना संदर्भात आढावा घेऊन योग्ये ती पाऊले उचलली जात आहेत, त्यास नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी, आव्हाने, प्रश्नांना तोंड देण्यास महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज असून नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.