तळेगावमधील इंदोरीत इंद्रायणी नदीपात्रात कार पडून एकाचा मृत्यू
पिंपरी (प्रतिनिधी) – नदीमध्ये कार पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 27) पहाटे घडली. तळेगाव एमआयडीसी येथील इंदोरी मधल्या इंद्रायणी नदीपात्रात ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
संजय पुनमचंद बोरसे (वय 44, रा. स्वामी समर्थ मंदिर, तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे संजय बोरसे हे त्यांच्या कारमधून तळेगाव-चाकण रोडने जात होते. इंदोरीकडून तळेगावकडे जात असताना इंदोरी गावाजवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुलावर संजय यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीच्या पुलावरून पाण्यात पडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नदीपात्रातील पाण्यात कार पडल्याने कारचे दरवाजे बंद असावेत. संजय यांना कारच्या बाहेर पडूनही स्वतःचा जीव वाचवता आला नसावा, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांना कार पाण्यात पडलेली आणि कारपासून काही अंतरावर नदीपात्रात एक मृतदेह दिसला. नागरिकांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली.